पीएनपी महाविद्यालयात पहावयास मिळणार ग्रामीण कलाकारांचे अभिनय
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या सौजन्याने ग्रामीण रंगभूमी अंतर्गत प्रभा करंडक 2024 या एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेश्वी येथील पीएनपी महाविद्यालयातील मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारी (दि.07) सकाळी दहा वाजता ही स्पर्धा सुरु होणार असल्याची माहिती राजन पांचाळ यांनी दिली.
पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ अंतर्गत ग्रामीण रंगभूमीच्यावतीने स्थानिक ग्रामीण भागातील कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभा करंडक एकपात्री अभिनय स्पर्धा भरविण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात असणार आहे. लहान गटात 18 व मोठ्या गटात 25 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. लहान गट सहा ते 14 वर्षे वयोगट व मोठा गट 15 वर्षांपासून पुढे असणार आहे. पूर्वी अशा प्रकारच्या अभिनय स्पर्धा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घेतल्या जात होत्या. शेकाप महिला आघाडी चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने हा रंगतदार सोहळा अलिबागमध्ये रायगडकरांना पहावयास मिळणार आहे.
अलिबाग, मुरूड, रोहा, उरण आणि पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांसाठी ही स्पर्धा मर्यादित आहे. दोन्ही गटातील विजेत्यांना वेगवेगळी बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये लहान गटातील प्रथम क्रमांकाला पाच हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला तीन हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये व चषक तसेच मोठ्या गटातील प्रथम क्रमांकाला सात हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला पाच हजार रुपये व चषक आणि तृतीय क्रमांकाला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ चषक देऊनही सन्मानित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.