पीएनपी संकुलात रंगणार ‘प्रभाविष्कार’ सोहळा

20 ते 23 डिसेंबरला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाद्वारे ‌‘प्रभाविष्कार’ या सांस्कृतिक सोहळ्याचे 20 ते 23 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा ठाव घेऊन त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारा व सर्वांगीण विकासाला वाव देणाऱ्या कार्यक्रमाचे सादरीकरण या सोहळ्यात होणार आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी येथील क्रीडा संकुलात मंगळवार दि.19 रोजी क्रीडा ज्योत पेटवून रॅलीला सुरुवात केली जाणार आहे. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहेत.

बुधवार (दि.20) ते शनिवार (दि.23) या चार दिवसांच्या कालावधीत प्रभाविष्कार सोहळा सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत रंगणार आहे. दि. 20 रोजी पहिल्या दिवशी सीबीएससी होली चाईल्ड शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. दुसऱ्या दवशी दि. 21 रोजी स्टेट बोर्ड होली चाईल्ड स्कूल, तिसऱ्या दिवशी दि. 22 रोजी प्राथमिक, माध्यमिक मराठी शाळा व बीएड महाविद्यालय आणि दि. 23 रोजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. या निमित्ताने शेवटच्या दिवशी महागरब्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यास टीव्ही मालिकांमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत. भव्यदिव्य स्वरुपात होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे पीएनपी संकुलाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

प्रभाविष्कारात खासदार अमोल कोल्हे ठरणार आकर्षण 
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलात दि.20 ते 23 या कालावधीत प्रभाविष्कार सोहळा आयोजित केला आहे. दि.23 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मराठीतील एक अभिनेते व राजकारणी खासदार अमोल कोल्हे यांची उपस्थिती असणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' तसेच झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेते कोल्हे या कार्यक्रमासाठी आकर्षण ठरणार आहेत. 
Exit mobile version