| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील श्री महागणपती सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष तथा कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून, 2024 चा. महाराष्ट्र राज्याचे हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक नावाचा देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा मानाचा शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
चिरनेर येथील प्रगतशील शेतकरी प्रफुल्ल काळुराम खारपाटील यांनी सेंद्रिय व पारंपरिक शेतीचा व्यवसाय उपजीविकेसाठी निवडला आहे. पूर्वापार शेती पद्धतीमध्ये बदल करून ते नवीन तंत्रज्ञानांतर्गत शेती करत आहेत. फुलशेती, कडधान्य, देशी गाईंचे संगोपन, दुग्ध व्यवसाय गांडूळ खत तसेच अनेक प्रकारचा भाजीपाला ते स्वतः पिकवित आहेत. विशेष म्हणजे ते कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. लहानपणापासून त्यांना कृषी क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी शेती करण्याकडे आपला कल वाढविला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते पशुपालन करतात. स्वतः सेंद्रिय खत गांडूळ खत घरी तयार करतात. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत, प्रफुल्ल खारपाटील यांनी भातासह अन्य कृषी लागवड करून सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शेती पूरक व्यवसाय, आधुनिक शेती, अवजारे. देशी गाईंचे संगोपन, दुग्ध व्यवसाय चारसुत्री, जीवामृत, दशपर्णी आर्क, हिरवळीचे खत, शेणखत, सेंद्रिय खत, लेंडी खत, लाल भाताची लागवड, काळ्या भाताची लागवड, वृक्ष रोपण, पॅक हाऊस ट्रॅक्टर, पावर टिलर, भात कापणीयंत्र, ड्रम सिडर असे शेती विषयक नवनवीन प्रयोग करीत असल्याने त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक या नावाने दिला जाणार पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच प्रफुल्ल खारपाटील यांना याआधीही 2019 -20 मध्ये त्यांना जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उत्कृष्ट कृषी मित्र पुरस्कार मिळाला आहे. रायगड जिल्हा स्तरीय राज्य भात पीक स्पर्धेत 2021- 22 आणि 2022- 23 असा सलग दोन वर्ष उरण तालुक्यात त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तर याच स्पर्धेत ते 2022- 23 मध्ये रायगडात ते पाचव्या क्रमांकाने विजय झाले आहेत. खारपाटील यांची कृषी क्षेत्रातील कामगिरी महत्त्वाची आहे. अनेक अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या शेतीची पाहणी केली असता, प्रफुल्ल खारपाटील यांनी केलेली शेती मधील प्रगती आवक करणारी वाटली. तेथील विहीर, पॅक हाऊस, ड्रम सीडर चार सुत्री पद्धतीची लागवड, शेती विषयक अवजारे, तबेला, देशी गाई विविध झाडांची लागवड आदी पाहता अधिकारी भारावून गेले.