‌‘प्रज्ञान’चा चंद्रावर प्रवास सुरू

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

चांद्रयान-3 मोहिमेतील ‌‘प्रज्ञान’ रोव्हर ‌‘विक्रम’वरून बाहेर पडला असून, त्याने दक्षिण ध्रुवावरील चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास सुरु केला आहे. लँडर आणि रोव्हरवरील सर्व यंत्रणा सुरळीत सुरु असल्याचं ‌‘इस्रो’नं जाहीर केलं आहे. दरम्यान, चंद्रावरील एक दिवस (पृथ्वीवरील 14 दिवस) ‌‘विक्रम’ लँडर आणि ‌‘प्रज्ञान’ रोव्हरचा प्रवास सुरु राहणार आहे. तरी, चंद्रावर दुसरा दिवस (पृथ्वीवरील 14 दिवसांनी) उजाडल्यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रीय होतील, अशी अपेक्षा ‌‘इस्रो’मधील संशोधकांना आहे.

चांद्रयान-3 चे ‌‘विक्रम’ लँडर 14 जुलैला पृथ्वीच्या पृष्ठभागावरून झेपावलं होतं. यानंतर 23 ऑगस्टला ‌‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत भारताने नवा इतिहास घडवला होता. भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) जाहीर केलेल्या वेळेनुसार 23 ऑगस्टला सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. आता ‌‘विक्रम’ लँडरमधून ‌‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडला असून, ‌‘इस्रो’नं त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, ‌‘प्रज्ञान’ रोव्हरवरील चाकांवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि ‌‘इस्रो’च्या लोगोची छाप आहे. ‌‘इस्रो’नं शेअर केलेल्या व्हिडीओत फिकटपणे चंद्राच्या पृष्ठभागावर ही छाप उमटवताना दिसत आहे.

‌‘प्रज्ञान’ काय काम करणार?
‌‘प्रज्ञान’ रोव्हरच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील दगड, माती, विवरे यांचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील टेकड्या आणि विवरांचं अचूनक स्कॅन करण्याचा प्रयत्न रोव्हरच्या सहाय्याने केला जाणार आहे. या परिसराची छायाचित्रे काढून त्याचा अभ्यास केला जाणार आहे.

Exit mobile version