चौलमळा कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाचा स्तुत्य उपक्रम
| चौल | प्रतिनिधी |
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीसमोर अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाने बुवा चंद्रकांत नवगावकर यांच्या माध्यमातून भजनरुपी सेवा सादर केली. भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चौलमळा येथील भजन मंडळाने रविवारी, (दि.14) आळंदीत माऊलीचा भजनाच्या माध्यमातून जयघोष केला.
इंद्रायणी काठच्या अलंकापुरी आळंदीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्तांची मांदियाळी कायमच पाहायला मिळते. राज्यभरात अनेक भजनप्रेमी, कीर्तनकार आपली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सादर करीत असतात. रविवारी अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील कृष्णादेवी प्रासादिक मंडळाने आपली भजनरुपी सेवा आळंदीमध्ये जाऊन सादर केली. चौलमळा गावचे माजी गावप्रमुख तथा माऊलीचे निस्सीम भक्त सुनील गणपत घरत यांच्या पुढाकारातून भजनी मंडळाला आळंदी येथे हजारो भक्तांच्या साक्षीने भजन सादर करण्याचा योग आला. यावेळी राज्यभरातून आळंदी येथे आलेल्या भक्तांनी भजनाचा आस्वाद घेत भजन मंडळाचे कौतुक केले.

दरम्यान, भजन मंडळाचे बुवा चंद्रकांत नवगावकर यांनी ‘अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र’ या श्लोकाने भजनाची सुरुवात केली. त्यानंतर ‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव’, ‘छंद जडला विठूरायाचा…’, ‘सखा माझा ज्ञानेश्वर..’ असे एकाहून एक सरस अभंगांचे सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांना तबलावादनाची साथ अजय वाडकर आणि प्रथमेश पाथरे यांनी, तर तालबद्ध चकवावादनाची साथ राजू केळकर यांनी दिली. यावेळी चौलमळाचे गावप्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, सचिव सचिन गोंधळी, चौलमळा युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्यासह उपस्थित असलेले गावचे माजी प्रमुख विलास शिवलकर, शशिकांत म्हात्रे, रमाकांत घरत, शैलेश नाईक, राजेंद्र नाईक, विजय सातांबेकर, महेश पाटील, बाळकृष्ण पाटील, विशाल घरत यांनी कोरस म्हणून साथ दिली. दरम्यान, चौलमळा कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाचे आळंदी येथील व्यवस्थापनाने पुष्पमालिका देऊन स्वागत केले. तसेच चंद्रकांत नवगावकर बुवांनी सादर केलेल्या विविध अभंग, गवळीणी आणि भजनांनी मन तृप्त झाल्याचे सांगत कौतुक केले.







