| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
एचएस प्रणॉयने गुरुवारी मलेशियाच्या ली झी जियाला तीन गेमपर्यंत चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत करत आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी गटात तब्बल 41 वर्षांनंतर भारताचे पदक निश्चित केले. मात्र, महिला एकेरीत पीव्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. दुखापतीमुळे पाठीला पट्टी बांधून खेळणाऱ्या प्रणॉयने जागतिक क्रमवारीत 16व्या स्थानी असलेल्या जियाला 78 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-16, 21-23, 22-20 असे पराभूत केले. प्रणॉयमुळे यंदाच्या स्पर्धेतील भारताचे बॅडमिंटनमधील दुसरे पदक निश्चित झाले. भारताने गेल्या रविवारी पुरुष सांघिक गटात रौप्यपदक मिळवले होते. 1982च्या स्पर्धेत सय्यद मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवले होते. हे भारताचे पहिले पदक होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता प्रणॉय चीनविरुद्ध सांघिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर चीनच्या लि शी फेंगचे आव्हान असेल.
महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानी असणाऱ्या सिंधूला पाचव्या स्थानी असणाऱ्या बिंगजियाओकडून 47 मिनिटे चाललेल्या सामन्यात 16-21,12-21 असे पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सिंधूचे आव्हान पदकाविनाच संपुष्टात आले.