कोर्लईचे प्रशांत मिसाळ अटकेत; उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता

। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील बेकायदेशीर जमीन व्यवहारप्रकरणी सात जणांविरोधात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. यातील उध्दव ठाकरे गटातील प्रशांत मिसाळ यांचा अटकपुर्व जामीन फेटाळल्याने त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अन्वय नाईक यांनी कोर्लई येथील सुमारे आठ एकर जागेत 19 बंगले बांधले होते. त्याची घरपट्टी अन्वय नाईक भरत होते. कोर्लई येथील जमीन ठाकरे व वायकर कुटूंबियांनी खरेदी केली होती. त्यानंतर ठाकरे व वायकर कुटूंबियांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन घेतली होती. रश्मी ठाकरे यांनीदेखील गेली अनेक वर्ष या जागेची घरपट्टी भरली असल्याचे समोर आले आहे. परंतू तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीच्या कालावधीत या जमीनीच्या खरेदीचा उल्लेख निवडणूक घोषणापत्रात केला नाही.

परिणामी, या जमीनीचा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. जमीनीतील बंगल्यांबाबत सोमय्या यांनी रायगड जिल्हयातील रेवदंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याबाबत चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

याप्रकरणी तत्कालिन ग्रामसेवक देवंगना वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, माजी सरपंच गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रिमा पिटकरी व प्रशांत मिसाळ यांच्याविरोधात 23 फेब्रुवारी रोजी रात्री रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यानंतर अटकपुर्व जामीनासाठी संबंधितांनी प्रयत्न केले. त्यात उध्दव ठाकरे गटातील प्रशांत मिसाळ यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला होता. अखेर सोमवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने प्रशांत मिसाळ यांना अटक करून त्यांना मांडवा सागरी पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांना दुपारी मुरुड येथील न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Exit mobile version