| मुंबई | प्रतिनिधी ।
लोकमान्य मंडळ बँक्वेट हॉल, माटुंगा येथे 23 व्या मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात माजी विश्व विजेत्या रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने शिवतारा कॅरम क्लबच्या राहुल सोलंकीला 24-20, 25-9 असे सरळ दोन सेटमध्ये हरवून या गटाचे विजेतेपद पटकवले.
मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित आणि लोकमान्य सोसायटी माटुंगा यांच्या लोकमान्य मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ए. के फाउंडेशनच्या सोनाली कुमारीने जैन इरिगेशनच्या मिताली पाठकवर 25-0, 22-11अशी मात करत विजय संपादन केला.
अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी प्रशांतने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धरियाला 21-14, 25-13 असे, तर राहुलने डी. के. सी. सी. च्या सिद्धांत वाडवलकरवर 22-9, 2-21 व 25-9 अशी मात केली होती. महिलांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करताना सोनालीने जैन इरिगेशनच्या ऐशा साजिद खानचा 24-13, 25-0 असा व मितालीने शिवतारा कॅरम क्लबच्या सिमरन शिंदेचा 21-7, 12-25 व 25-2 असा पराभव केला होता.
विजेत्या खेळाडूंना ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू मनोहर गोडसे व लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष नविन जोशी, कार्याध्यक्ष सुहास बेडेकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार संजय देसाई व आंतरराष्ट्रीय पंच अजित सावंत यांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचे वर्चस्व
