अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर प्रशांत नाईक यांनी केली सुरक्षा पाहणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन-दिवेआगर येथील विद्यार्थ्यांच्या समुद्रातील दुर्घटनेने पर्यटनस्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज अधोरेखित केली आहे. दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य करण्यापेक्षा दुर्घटना घडण्याची शक्यता आधीच ओळखून ती टाळण्यावर भर देण्याची भूमिका घेत अलिबाग परिषदेचे सभापती प्रशांत नाईक यांनी अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व लाईफगार्डना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. सध्या अलिबाग समुद्रकिनारी चार पुरुष व एका महिला लाईफगार्डची नियुक्ती असून, बचावासाठी एक स्पीडबोट, स्ट्रेचर, लाईफ जॅकेट्स तसेच भरती-ओहोटीच्या सूचनांसाठी सायरनची व्यवस्था उपलब्ध आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांची तैनाती, बचाव बोटी, सुरक्षा साधने, पर्यटकांची वर्दळ असलेली ठिकाणे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची यंत्रणा यांचा प्रशांत नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे, अभियंता मुंडे यांनी आढावा घेतला. केवळ जीवरक्षक आणि बचाव बोटी उपलब्ध असणे पुरेसे नसून, कोणत्या ठिकाणी, कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या वेळी अधिक धोका निर्माण होऊ शकतो, याचे पूर्वनियोजन आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.
“पर्यटक समुद्राचा आनंद घेण्यासाठी येतात; त्यांना समुद्राची भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना या दुर्घटनेनंतरच्या प्रतिसादापुरत्या मर्यादित न राहता, दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने असायला हव्यात,” असे प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले.
पर्यटकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून, समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
