कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष; कोळी समाजाच्या विश्वासाला प्रशांत नाईकांची साथ

धार्मिक उत्साहासोबत सामाजिक एकजुटीचे दर्शन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

समुद्राशी नातं आणि परंपरेशी नाळ जोडलेल्या कोळी समाजाच्या नारळी पौर्णिमेला यंदा धार्मिक उत्साहासोबत सामाजिक एकजुटीचेही दर्शन घडले. अलिबाग कोळीवाड्यातील श्री खंडोबा मंदिरापासून समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत अलिबाग नगर परिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक सहभागी झाले. कोळी बांधवांसोबत पारंपरिक सोहळ्यात सहभागी होत त्यांनी समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेशी असलेला आपला थेट संवाद अधोरेखित केला.


कोळी समाजाची उपजीविका समुद्रावर अवलंबून असल्याने नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी आणि नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी समुद्रदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. याच श्रद्धेतून श्री खंडोबा मंदिरातून सोन्याचा नारळ रथात विराजमान करून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, बँडच्या तालावरचा उत्साह आणि पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष व लहान मुलांचा सहभाग यामुळे संपूर्ण कोळीवाडा जल्लोषात न्हाऊन निघाला. मिरवणुकीत प्रशांत नाईक यांनी कोळी बांधवांसोबत सहभागी होत उत्सवाचा आनंद घेतला. त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता समाजाशी जोडलेपणाचा संदेश देणारा ठरला.

सायंकाळी समुद्रकिनारी विधिवत पूजा करून समुद्रदेवतेला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी कोळी बांधवांनी सुरक्षित मासेमारी हंगाम, कुटुंबांचे सुख-समृद्धी आणि व्यवसायात भरभराटीसाठी प्रार्थना केली. कोळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचा सन्मान आणि त्यांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांशी जोडलेपण हे स्थानिक नेतृत्वाचे महत्त्वाचे अंग आहे. याच भूमिकेतून प्रशांत नाईक यांची या सोहळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली. परंपरा जपत समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व अशी प्रतिमा या निमित्ताने अधोरेखित झाली.

याप्रसंगी अनिरुद्ध भगत, नगरसेवक सागर भगत, ॲड. ऋषिकेश माळी, अनिल चोपडा, ॲड. प्रवीण ठाकूर, एडवोकेट अंकित बंगेरा, विजय भगत, चिंतामण भगत यांच्यासह कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने श्रद्धा, संस्कृती आणि समाजाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा संगम अलिबाग कोळीवाड्यात अनुभवायला मिळाला.

Exit mobile version