स्वखर्चाने खड्डे भरून जपली सामाजिक बांधिलकी
| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |
अलिबाग-वडखळ मार्गावरील अलिबाग शहरातील प्रवेशद्वार ते चेंढरे बायपास रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास राष्ट्रीय महामार्ग विभाग उदासीन ठरले. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत चेंढरे बायपास ते शहरातील प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याची दूरुस्ती बुधवारी (दि.10) स्व खर्चाने केली. या खड्डेमय रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता वाहतूकीसाठी सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला.
अलिबाग शहराचे प्रवेशद्वार ते चेंढरे बायपास रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. खड्डेमय रस्त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यांची अवस्था बिकट झाली होती. खड्डे वाचवितांना अनेकवेळा अपघात होत आहेत. रस्त्यावरून ये जा करताना विद्यार्थी व पालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. पर्यटकांसह नागरिकांची हजारोच्या संख्येने या ठिकाणी वर्दळ असते. शहराच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्व खर्चाने रस्त्याची दूरुस्ती करण्यासाठी पाऊल उचलले. बुधवारी (दि.10) त्यांनी कामाच्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून खड्डे डांबरांनी भरून घेतले. शासनाच्या निष्क्रियतेमुळे त्रस्त नागरिकांना एकदा दिलासा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेतला. बिकानेर स्वीट्ससमोर व आसपासचे प्रचंड खड्डे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून डांबरीने भरून घेतले. यापुर्वीदेखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत चेंढरे बायपास रस्त्यावर पेव्हर ब्लॅक बसवून घेतले.






