प्रविणा सावंत, अतुल मांडवकरला 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

। पेण । प्रतिनिधी ।
पेणमधील प्रविणा सावंत आणि अतुल मांडवकर या जोडीला पेण न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडीत वाढ केली आहे. या जोडीने आत्तापर्यंत अनेकांना फसविल्याचा संशय पोलीसांना असल्याने न्यायालयात पोलिसांकडून कोठडीची मागणी केली. त्याला न्यायालयाने दुजोरा देउन 12 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

या दोघांनी आत्तापर्यंत जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी देण्याचे तसेच या कंपनीत ठेका मिळवून देण्याचा खोटा बनाव करुन आत्तापर्यंत जिल्हयातील 43 तरुणांची 31 लाख 79 हजारांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. परंतु असे अनेक जण आहेत की ते समोर येण्याचे धाडस करत नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे यातील मुख्य आरोपी प्रविणा सावंत हिने अतुल मांडवकर यास अर्जुन कामत म्हणून पीडितांशी फोनवर संपर्क साधण्यास सांगून अर्जुन कामत नावाने अनेकांना गंडा घातला आहे. परंतु अर्जुन कामत नावाचा असा कोणीही व्यक्ती अस्तित्वातच नाही. हे ही सिद्ध झाले आहे.

प्रविणा सावंत या आत्तापर्यंत मोठमोठया राजकीय मंडळीच्या सोबत देखील व्यासपीठावर दिसल्या आहेत. काही काळ शिवसेनेच्या व काही काळ राष्ट्रवादीच्या पदाधिकारी म्हणून पेण शहरात मोठ मोठयाले बॅनल लावून स्वतःची प्रसिद्धी करत. त्यामुळे अनेकजण तिच्या दिखाऊपणाला भुलल्याचे देखील समोर येत आहे. या अगोदर पेण पोलीस ठाण्यात एका डॉक्टरला फसविल्याची तक्रार देखील समोर येत आहे. या जोडीने आत्तापर्यंत किती जणांना वेगवेगळया नावाने गंडा घातला असेल, याचा शोध पोलीस करत आहेत.

या फसवणूक प्रकरणातील दोन्ही आरोपींची संपूर्ण मालमत्ता व बँक अकाउंट गोठवण्याची मागणी फिर्यादीचे कुटुंब व पेण तालुक्यातील जनता करत आहे. तसेच या प्रकरणात पेण तालुक्यासह रायगड जिल्हयातील आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याज लेखी तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version