अखेरच्या हंगामात कोलंबीचा जॅकपॉट

मच्छिमारांना दुष्काळात आशेचा किरण
| मुरूड-जंजिरा | प्रकाश सद्रे |

समुद्रात मोठ्या मासळीच्या दुष्काळामुळे मुरूड तालुक्यातील 70 टक्के मोठ्या नौका 1 जूनपूर्वीच किनार्‍यावर शाकारुन ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, 30 टक्के एकदरा येथील छोट्या नौका काहीतरी मासळी मिळेल या अपेक्षेने किनार्‍याजवळ उथळ समुद्रात जात असतात. अखेरच्या हंगामामध्ये त्यांची ही अपेक्षा सफल झाली, असे गेल्या चार दिवसांपासून दिसून येत आहे.


एकदरा परिसरातील नौकांना मुरूडसमोरील समुद्रात पद्मजलदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणात कोलंबी मिळू लागल्याने मासळी दुष्काळात आर्थिक आशेचा मोठा किरण गवसल्याचे दिसून येत आहे. एकदरा महादेव कोळी समाज अध्यक्ष पांडुरंग आगरकर, मुरूड महादेव कोळी समाज अध्यक्ष आणि रायगड मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, मासळीच्या दुष्काळाने होरपळलेल्या छोट्या मच्छिमारांना कोलंबी मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने एक प्रकारे अचानक जॅकपॉटच लागला आहे.


गेल्या 4 ते 5 दिवसांपासून एकदरा येथील 30 ते 40 छोट्या 2 सिलिंडर्सवाल्या नौका दिवसात 2 ते 3 वेळा कोलंबीच्या मासेमारीस जाताना दिसून येत आहेत. कोलंबी, मांदेली अशी छोटी मासळी मिळत असल्याने कोलंबीचे सोडे काढण्यासाठी कोळी भगिनींची मोठी लगबग सुरू असल्याचे एकदरा येथील मच्छिमार रोहन निशानदार यांनी सांगितले. अशी मासेमारी दिवसा-रात्री दोन वेळा केली जाते असे सांगून रोहन निशानदार म्हणाले की, सध्या कोलंबी मोठया प्रमाणात मिळत असल्याने कातळावर सुकविलेल्या सोड्याचा भाव रुपये 1700/- किलो असून, हे भाव आवाक्यात येण्याचे दिसत आहेत. ओल्या कोलंबीचा साधारण एक किलो टोपलीचा प्रतवारीप्रमाणे भाव 200 ते 300 रुपये असून, टायनी, चैती अशा प्रकारातील ही लाल कोलंबी आहे.

मुरूडच्या बाजारात राजपुरीचा जवळा
मुरूडपासून चार कि.मी.वर असणार्‍या राजपुरी येथील समुद्रकिनारी कोलिम म्हणजे जवळा येत असून, मुरूडच्या मार्केटमध्ये विक्रीस येत आहे. 50/- रुपयाला दोन वाटेप्रमाणे याची विक्री राजपुरी येथील महिला करताना दिसून येतात. राजपुरी येथील जवळा खूप चविष्ट असल्याने मागणी वाढती आहे. फ्राय जवळा रेसिपी ही ग्रामीण भागात लोकप्रिय असून, आता पुणे, मुंबईतील पर्यटकांच्या पसंतीस हळूहळू उतरू लागली आहे.

गेल्या 3 ते 4 वर्षांत मासळीच्या दुष्काळाचे हे संकट यावर्षी अधिक गडद झाल्याने मच्छिमार मोठ्या प्रमाणात होरपळला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये शासनाने मच्छिमारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे, ही काळाची गरज आहे.

मनोहर बैले, अध्यक्ष, रायगड मच्छिमार कृती संघ
Exit mobile version