बकरी ईदसाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनामुळे उद्वलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी, असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. यावर्षी दि. 21 जुलै रोजी बकरी ईद असून, ती साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चैन’ चे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक असेल असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.