झिराडमध्ये होणार कर्करोग पुर्व तपासणी

सीएफटीआय, साई क्रीडा मंडळ, महिला मंडळ, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन, एससीजी ग्रुप यांचे सहकार्य
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये स्तनाचे कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर अशा अनेक प्रकारच्या कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना कॅन्सरचे निदान तातडीने व्हावे, यासाठी रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने झिराड येथे कर्करोग पूर्व तपासणी शिबीर रविवारी घेण्यात येणार आहे.

झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळ, मुंबईमधील ग्रामीण प्रगती फाऊंडेशन, एससीजी ग्रुप आणि सीएफटीआयच्या सहकार्याने हे शिबीर रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्या मंदिरात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास होणार आहे. या शिबिराचा शुभारंभ सीएफटीआयच्या मार्गदर्शक व विश्‍वस्त चित्रलेखा पाटील, सभापती दिलीप भोईर, एससीजी ग्रुपचे सुरींदर डांग, ग्रामीण प्रगती फाऊंडेशनचे संस्थापक देवांग नेराल्ला, अध्यक्ष डॉ. अमरेंद्र साहू, शांतून सहाय, फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफळे, सरपंच दर्शना भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

कर्करोगाचे निदान लवकराच लवकर होऊन रुग्णांवत तातडीने उपचार करता यावा, यासाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला असून, या शिबिरामध्ये तोंडाचा कर्करोग, तसेच स्त्री व पुरुषांची संपूर्ण शारीरिक तपासणी, स्तन, गर्भाशय कर्करोग व स्त्री रोग तपासणी तज्ज्ञांद्वारे केली जाणार आहे. या शिबिरात जास्त नागरिकांनी, महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिलीप भोईर यांनी केले आहे.

संशयित रुग्णांचे निदान करण्यासाठी मुंबई येथील टाटा मेमोरिअल व जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी त्यांना जावे लागते. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी एकाच ठिकाणी या आजाराचे निदान तातडीने व्हावे. उपचार लवकर करून रुग्णांना बरे करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला आहे.

– दिलीप भोईर, समाजकल्याण सभापती, रायगड जिल्हा परिषद

Exit mobile version