| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्याच औद्योगिकीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या तालुक्यात पावसाळ्यात यावर्षी नैसर्गिक संकट ओढावणार नाही यासाठी सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकार्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. तसेच मान्सून पुर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उरणचे तहसीलदार डॉ उदय कदम यांनी उरण तालुक्यातील विविध खात्यांच्या अधिकार्यांना केले आहे.
मान्सून पुर्व तयारी 2024 या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी व विविध खात्यांच्या अधिकार्यांसमवेत चर्चा करण्यासाठी उरणचे तहसीलदार डॉ उदय कदम यांनी विविध खात्यांच्या अधिकार्यांसमवेत मान्सून पुर्व आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी (दि.22) पंचायत समितीच्या सभागृहात केले होते. यावेळी उरणचे तहसीलदार डॉ उदय कदम यांनी सांगितले की स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, सिडको, उरण नगर परिषद, महावितरण कंपनी उरण, प्रकल्प व्यवस्थापन व इतर तालुक्यातील कार्यालयातील संबंधित अधिकारी वर्गाने आप आपल्या हद्दीतील कामांचा आढावा घेऊन रेंगाळत पडलेल्या कामांना गती देण्याचे काम करावे जेणेकरून यावेळी तरी उरण तालुक्यावर नैसर्गिक संकट ओढावणार नाही.
यावेळी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, उरण पंचायत समितीचे अधिकारी श्री डाबेराव, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, महावितरण कंपनीचे उप अभियंता विजय सोनवणे, पोलीस अधिकारी सह विविध खात्यांचे अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सह ग्रामसेवक उपस्थित होते.