| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यात सध्या ग्रामीण भागात घरांच्या शाकारणीच्या कामांना नागरिकांनी सुरूवात केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नेहमीच होणारा वातावरणीय बदल व मे पासून तर अनेकवेळा ढगाळ वातावरण व अनेक ठिकाणी पडणारा पाऊस यामुळे नागरिकांनी आता घरांच्या शाकारणीच्या कामांना जोरात सुरूवात केली आहे. तसेच मान्सून लवकर येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने प्रत्येकाची कामे सुरू असल्याने मजूरीने माणसेही मिळेनाशी झाली आहेत. कोठे कौले फुटतुट, तर कोठे कौलारू घरांच्या रिपा कुजल्याने, तर काही घरांचे पत्रे तुटल्याने त्यात्या ठिकाणी नवीन कौले आणून टाकली जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही अधिक प्रमाणात कौलारू घरे असल्याने फुटतुट झालेल्या कौलांच्या ठिकाणी कौलांचाही तुटवडा पडत आहे. कौले बाजारात मिळताना कठिण होऊन बसले आहे.मात्र तरीही कौले उपलब्ध करून नागरिक आणत आहेत व घरांची शाकहारणी पावसाळ्या पूर्वी करण्यात नागरिकांची लगबग सुरू आहे. अवकाळी पाऊस कधीही पडत असून नियमित ढगाळ वातावरण होत असल्याने घराची शाकारणी लवकर करण्याकडे नागरिक अधिक भर देत असल्याचे पहावयास मिळत आहे.







