पक्षांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

आधुनिक तंत्रज्ञान, हवामान खात्याचे अंदाज आणि मोबाईलवरील विविध ॲप्स उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही निसर्गातील घडामोडींवरून पावसाचा अंदाज बांधताना दिसून येत आहेत.

कावळ्याचे घरटे, मुंग्यांचे स्थलांतर, बिळाच्या तोंडाशी येणारे बेडूक आणि पक्ष्यांच्या हालचाली यावरून पावसाची चाहूल घेतली जाते. ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या मते, कावळा झाडाच्या उंच व सुरक्षित फांदीवर घरटे बांधत असेल तर त्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असते. तसेच मुंग्या मोठ्या प्रमाणात अन्नसाठा करताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसल्यास पाऊस जवळ आल्याचे संकेत मानले जातात.

पावसाळ्यापूर्वी बेडूक बिळातून बाहेर पडून बिळाच्या तोंडाशी दिसू लागतात. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे त्यांच्या हालचाली वाढतात, असे शेतकरी सांगतात. याशिवाय ढगांची दिशा, वाऱ्याचा वेग, पक्ष्यांचे थवे आणि कीटकांच्या हालचाली यांचाही अभ्यास करून पावसाचा अंदाज बांधला जातो. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी पेरणीचे नियोजन करताना अशा पारंपरिक संकेतांनाही महत्त्व देतात. आधुनिक हवामान अंदाजासोबतच पिढ्यान्‌‍ पिढ्या चालत आलेले निसर्ग निरीक्षणाचे ज्ञान आजही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पावसाळा तोंडावर आला असताना शेतकरी आकाशाकडे नजर ठेवून आहेत.निसर्गातील या संकेतांमुळे पावसाच्या आगमनाबाबत उत्सुकता वाढली असून, शेतीच्या कामांना वेग देण्याची तयारी सुरू झाली आहे.

Exit mobile version