चिवणी माशांना खवय्यांची पसंती

। अलिबाग । वार्ताहर ।
समुद्राची मासळी सागरी मासेमारी बंदीमुळे येणे बंद झाले आहे. त्यामुळे आता अलिबागकरांना खाडीच्या मासळीला मागणी वाढत चालली आहे. यात चवीला व खायला सर्वांत रुचकर असलेल्या चिवणी माशांना भलतीच मागणी वाढली आहे. दरवर्षी समुद्री मासेमारी बंदीमुळे चिवणी माशांना मागणी वाढत आहे. या मासळीमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत असून खवय्यांचीदेखील चिवणी मासे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेकडे पावले वळू लागली आहेत.


मत्स्यप्रजननाच्या काळात समुद्री मासेमारीवर बंदी येते. त्यामुळे पुढील तीन महिने अलिबागकरांना नदी-तलाव व खाडीच्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. नदी-तलाव व खाडीतून मिळणार्‍या गावठी मासळीला पावसाळ्यात चांगली मागणी असते. यात खाडीत मिळणार्‍या चिवणी माशांना चांगला भाव मिळतो. चिवणी माशांचे वाटे 100 पासून ते 200 रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवले जातात. चांगला भाव मिळत असल्याने स्थानिक मासेमारांनादेखील चांगला रोजगार प्राप्त होत आहे. सध्या बाजारपेठेत चिवणी माशांना चांगली मागणी असनू दूरवरून ग्राहक पडेल त्या किमतीला चिवणी खरेदी करण्यासाठी येतात.

Exit mobile version