श्रीलंकेत भारतीय कांद्याला पसंती

। नाशिक । वृत्तसंस्था ।
भारतीय कांद्याचा दर 550 डॉलर असतानाही श्रीलंकेतील व्यापार्‍यांनी भारतीय काद्यांला विशेषतः नाशिकच्या कांद्याला पसंती दिली आहे. त्यामुळे श्रीलंकेकडे कांद्याने भरलेले कंटेनर रवाना होत आहेत. मात्र, पाकिस्तानच्या कांद्याच्या भावाला टक्कर देण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत नवीन लाल कांदा येईपर्यंत वाट पाहावी लागेल, असा निर्यातदारांचा अंदाज आहे.
दिवाळीनिमित्त कांद्याचे लिलाव बंद असल्याने दिवाळीनंतर लिलाव सुरू होताच आवक वाढल्याने भावाची स्थिती काय राहील, याबद्दलची चिंता शेतकर्‍यांमध्ये आहे. मात्र, बाजारपेठेच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार दिवाळीनंतर लिलाव सुरू झाले, तरीही भाव किलोला दोन ते तीन रुपयांनी किमान आठवडाभर वर राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन कारणे देण्यात आली आहेत, ती म्हणजे, सुट्यांमुळे व्यापार्‍यांना यापूर्वी खरेदी केलेला कांदा विक्रीसाठी उसंत मिळाली आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचा खरेदीकडील कल राहणार असल्यासोबत देशांतर्गत नाशिकच्या उन्हाळ कांद्याला मागणी कायम राहणार आहे.
सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, विदर्भाच्या काही भागात 3 ते 6 नोव्हेंबरला वळीव स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र अभ्यासकांनी वर्तविली आहे. जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता अभ्यासकांना वाटते आहे. मात्र कांदा, डाळिंब, द्राक्षे आणि भाजीपाला उत्पादक नाशिक जिल्ह्यात ढगाळ हवामान राहील. परंतु लासलगाव, येवला परिसरातील तुरळक पावसाचा अपवाद वगळता इतरत्र पाऊस होणार नाही, असेही अभ्यासकांनी म्हटले आहे.
सद्यःस्थितीत नाशिक जिल्ह्यात पाऊस होईल आणि कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त होऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर हवामानशास्त्र अभ्यासकांनी दिलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील फलोत्पादन क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारी आहे.

Exit mobile version