| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शार्लोट लेक तलावात नवी मुंबईतील तीन तरुण बुडाले असल्याची घटना घडली आहे. सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने या तिघांचा शोध सुरू आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून दहा जणांचा समूह माथेरानमध्ये पर्यटनासाठी आला होता. यातील काही शार्लोट लेक तलावात पोहण्यासाठी उतरले. यातील तीन जण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. सुमित चव्हाण (16), आर्यन खोब्रागडे (19 ) आणि फिरोज शेख (19)अशी बेपत्ता असलेल्या तरुणांची नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस, नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी आणि स्थानिक बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी या तिघांचा शोध सुरू केला. मात्र रात्री उशिरापर्यंत तिघांचा शोध लागला नव्हता. माथेरान शहराला पाणीपुरवठ्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शार्लेट परिसरात पोहण्यास मनाई आहे. मात्र हे मनाई आदेश धुडकावत अनेक पर्यटक पोहोण्यासाठी तलावात उतरत असतात. स्थानिक परिस्थिती आणि पाण्याचा अंदाज न आल्याने अशा दुर्घटना घडतात.