जि.प. शाळा प्रवेशोत्सवासाठी सज्ज
| अलिबाग | प्रतिनिधी |
उन्हाळी सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा सोमवार दि.16 जूनपासून सुरू होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांपासून ते अन्य शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार आहे. यावेळी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच, आजपासून शाळा सुरू होत असून दोन दिवसांपूर्वीपासून विद्यार्थ्यांसह पालकांची छत्री, रेनकोट व दप्तर खरेदीची लगबग सुरू झाली होती. मात्र, यंदा कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीमुळे या वस्तूंमध्ये दहा टक्क्याने वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर परीक्षा संपल्या. त्यानंतर शाळांना सुट्टी सुरु झाली. दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर जिल्ह्यातील शाळा आजपासून सुरु होत आहेत. शाळा सुरू होण्यापुर्वी दोन दिवस अगोदरच शाळेतील शिक्षकांना शाळेत जाऊन स्वच्छता व साफसफाई करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने शाळेची साफसफाई झाली असून शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी अनेक शिक्षकांनी पुढाकार घेत घरोघरी जाऊन पालकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असून शाळेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. तसेच, आज शाळेतील पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ व गुलाब पुष्प देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बाजारपेठा शालोपयोगी वस्तूंनी गजबजल्या आहेत. शाळा सुरु होण्यापुर्वी बाजारात रविवारपर्यंत विद्यार्थ्यांसह पालकांची कंपास, वही, दप्तर अशा अनेक प्रकारच्या शालेय साहित्यांसह छत्री व रेनकोट खरेदी करण्याची लगबग सूरू होती. यावेळी बाजारात वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे तसेच विद्यार्थ्यांच्या पसंतीचे दप्तर उपलब्ध आहेत. शंभर रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत शाळेचे दप्तर बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर यावर्षी पाऊस लवकर सूरू झाल्याने मे महिन्यातच छत्री खरेदीला सुरुवात झाली होती. लहान मुलांपासून मोठ्यांच्या आवडीची छत्री बाजारात उपलब्ध असून त्यांची किंमत 150 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असल्याची माहिती विक्रेते संदेश तुणतुणे यांनी दिली आहे.
दोन महिन्यांनी घंटा वाजणार
शाळांच्या उन्हाळी सुट्टीनंतर तब्बल दोन महिन्यानंतर आजपासून जिल्ह्याभरातील शाळांची घंटा वाजणार आहे. सुचने प्रमाणे शाळेची साफसफाई आणि स्वच्छता करण्यात आली असून शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तसेच, शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांसह गणवेश, पायमोजे व बूटाचे वाटप केले जाणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण विभाग व स्थानिक शालेय व्यवस्थापन कमेटीच्यावतीने प्रवेशोत्सव व स्वागतोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.