आधुनिक भात लावणीला मुरूड तालुक्यात प्राधान्य

मुरूड | वार्ताहर |
मुसळधार पाऊस पडल्याने मुरूड तालुक्यात विविध ठिकाणी भात लावणीची कामे सुरू आहेत. मुरूड सारख्या ग्रामीण तालुक्यात आता पर्यंत बैल व नांगर घेऊन नांगरणी करून आणि सामुदायिक पध्दतीने मजूर घेऊन लावणी केली जात असे. कोरोना अरिष्ट आल्यानंतर ग्रामीण भागात बदल होताना दिसून येत असून बैल नांगरणी ऐवजी यांत्रिक म्हणजे पावर ट्रीलरने भात लावणी करण्या कडे शेतकरी वळल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात खारआंबोली, वाणदे, शिघ्रे, जोसरांजन, खतीबखार, गोयगान आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत अभावानेच बैल नांगर घेऊन लावणी करताना शेतकरी दिसतात त्याची जागा आता पावर ट्रीलर घेत असल्याचे या गावातून आढळून आले.काही शेतकरी मंडळीनी सांगितले की, मजुरीने भात शेती परवडत नाही.एक मजुराची दिवसाची मजुरी 500/- रुपये आहे.10 ते 15 मजूर लावणी साठी लागतात. जे काम करायला संपूर्ण दिवस लागतो तेच काम पावर ट्रीलर एका तासात आणि कमी खर्चात करतो.त्या मुळे मुरूड सारख्या ग्रामीण भागात शेतकरी देखील आधुनिक शेतीला प्राधान्य देत असल्याची माहिती खार- आंबोली येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विकास कमाने, यांनी दिली.बैल आणि नांगर यांचाही वेगळा खर्च येतो.

डाला लावणी पध्दत बंद
3 ते 4 कुटुंबातील एकत्र आलेल्या माणसांनी सामुदायिकरित्या लावणीसाठी काम करणे या पद्धतीला डाला लावणी पध्दत म्हटले जाते.2 वर्षां पूर्वी कोरोना साथ आल्यानंतर ही पद्धती बंद झाली.त्या ऐवजी पावर ट्रीलर ने मजुरांची जागा घेतली.आधुनिक यंत्रा मुळे श्रमशक्ती कमी लागून कमी वेळात जास्त काम होत असल्याने कोकणातील ग्रामीण भागातील शेतकरी देखील नव्या शेती साधनांकडे वळू लागला आहे.

Exit mobile version