अतिवृष्टीत गाभण म्हशी गेल्या वाहून

। म्हसळा । वार्ताहर ।

मागील पाच दिवस म्हसळा तालुक्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून 8 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत पाष्टी येथिल दुग्ध व्यवसायीक जगजीवन लाड यांच्या दोन गाभण म्हशी वाहून गेल्याची घटना घडली आहे. रोजच्या प्रमाणे लाड यांच्या म्हशी देहण जंगलभागात चरण्यासाठी गेल्या असता त्या सायंकाळी घरी परतत असताना पाष्टी देहन नदिला पावसाचे पाण्याने पुर आला होता. या पुरात दोन्ही म्हशी वाहून गेल्याने जीवन लाड यांचे सुमारे 1.80 लक्ष रूपयांचे नुकसान झाले असल्याचे म्हसळा महसुल विभागामार्फत केलेल्या पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे. लाड यांनी दोन दिवस अथक प्रयत्न करीत देहण नदी नाल्यांमध्ये शोध घेतला असता त्यांना म्हशी पुराचे पाण्यात वाहून गेल्याचे निदर्शनात आले. मयत म्हशी नदी पात्रातील झाडी झुडपात अडकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या नैसर्गिक आपत्तीत जगजीवन लाड यांचे गो धनाचे मोठे नुकसान झाले असल्याने त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Exit mobile version