प्रसुती महिला कोरोना कक्षात: नातेवाईकांचा आरोप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा रुग्णालयात प्रसृती झालेल्या रुग्णांच्या कक्षात संशयीत कोरोना रुग्णांना दाखल केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत तक्रार केली. त्यानंतर सदर रुग्णाला कोरोना कक्षात हलविण्यात आले. याबाबत रुग्णालय प्रशासनासोबत संपर्क साधला असता होऊ शकला नाही. दरम्यान, उपस्थित अधिपरिचारीका यांनी कोरोनाचे रुग्ण नसल्याने कोरोना कक्ष सुरु केला नसल्याने सदर रुग्णाला संबंधीत कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मात्र कोरोना कक्ष सुरु करुन पॉझेटिव्ह रुग्णांना तेथे ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

राज्यासह रायगड जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांना खबदारीच्या सुचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मास्क सक्ती देखील करण्याचे संकेत दिले जात आहेत. अशातच मंगळवारी उशिरा जिल्हा रुग्णालयातील प्रसृती कक्षात एका संशयीत महिला रुग्णालयाला दाखल करण्यात आले. तोंडाला मास्क लावलेला असल्याने या रुग्णाबाबत दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेत इतरत्र हलविण्याची मागणी केली. सदर कक्षात प्रसृत झालेल्या महिला आणि त्यांचे बाळ असल्याने त्यांना संसर्ग होण्याची भीती असल्याने नातेवाईकांनी संताप देखील व्यक्त केला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या महिला रुग्णाला कोरोना कक्षात हलविण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण बाहेर दौर्‍यावर असल्याने अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र अतिरिक्त शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. याबाबत उपस्थित अधिपरिचारीका यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सध्या कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल होत नसल्याने कोरोना कक्ष सुरु करण्यात आलेला नव्हता त्यामुळे सदर रुग्णाला महिलांच्या कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोरोना विभाग सुरु करुन तेथे संबंधीत रुग्णांना दाखल केल्याचे सांगितले.

Exit mobile version