उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिलांची फरफट

प्रसूतीतज्ज्ञ नसल्याने आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे गरोदर महिलांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कर्जतसाठी नेमलेले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याने कर्जत तालुक्यातील गोरगरीब व गरोदर महिलांना आरोग्य सेवेसाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. रामदास तरपेवाड यांना 2023 साली उसनवारी तत्त्वावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, त्यांचा पगार कर्जत येथूनच सुरू असूनही ते अद्याप माणगाव येथेच कार्यरत आहेत. परिणामी, कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सध्या कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आली आहे.

प्रसूतीसारख्या संवेदनशील सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा खोपोली आणि कर्जत परिसरातील खासगी डॉक्टरांना बोलावावे लागते. काही वेळा गरोदर महिलांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक भारही सहन करावा लागत आहे. रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ नसल्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूती करणे शक्य नसल्याचेही सांगितले जात आहे. गंभीर बाब म्हणजे, 2023 पासून प्रतिनियुक्तीवर गेलेल्या डॉ. तरपेवाड यांची आजपर्यंत प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तातडीने कायमस्वरूपी प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. महाड येथे सेवा बजावणारे आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर असलेले डॉक्टर तात्काळ कर्जत येथे रुजू करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. कैलास मोरे यांनी केली आहे. त्यांनी इशारा दिला की, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास गरोदर महिलांच्या आरोग्याशी होणाऱ्या या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल.

Exit mobile version