गरोदर महिलेच्या पतीकडून लेखी तक्रार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णलयात तालुक्याच्या विविध भागातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. (दि.26) एप्रिल रोजी कर्जत शहरातील गरोदर महिला या बाळंतपणासाठी रुग्णलयात दाखल झाली होती. तिच्याकडून उपजिल्हा रुग्णलयातील डॉक्टरांनी तीन हजार रुपयांची मागणी केली असून, त्याबाबत संबंधित महिलेच्या पतीने चौकशीची मागणी केली आहे. कर्जत शहरातील सरताज लियाकत अली खान यांनी आपली पत्नी नसरीन लियाकत अली खान यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉ. मोरे यांनी सरताज लियाकत अली खान यांच्याकडे उपचार करण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया इत्यादी सुविधा मोफत दिल्या जात असतानाही डॉ. मोरे यांनी पैशांची मागणी केल्यामुळे लियाकत खान यांनी ही बाब आपले पती सरताज यांच्या कानांवर जाऊन घातली. त्यानंतर सरताज खान यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय म्हसकर यांच्याकडे लेखी तक्रारदेखील केली आहे.
परंतु रुग्णलयात वैद्यकीय अधीक्षक डॉ मस्कर यांच्याकडून डॉ. मोरे यांच्यावर कारवाई केली नाही. दुसरीकडे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून रुग्णालय परिसरात आणि अंतर्गत भागाची पाहणी केली जात नाही, असा आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. अक्षम्य दुर्लक्षामुळे उपजिल्हा रुग्णालय परिसरात तसेच रुग्णांच्या वॉर्डमध्ये भरमसाठ घाणीचे साम्राज्य पसरले असून, महिला व पुरुष रुग्णांसाठी असलेल्या शौचालयांची बिकट अवस्था झाली आहे. महिला रुग्णांच्या शौचालयाचे दरवाजे अर्धवट तुटलेले असल्यामुळे महिला रुग्णांची कुचंबणा होत आहे. परंतु, उघड्या डोळ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाची होत असलेली दुरवस्था वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय म्हसकर यांना दिसत नाही का? उपजिल्हा रुग्णालयात सर्व सामान्य गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळायला हवे असतानाही अशाप्रकारे पैशांची मागणी केली जाते, यावर वैद्यकीय अधीक्षक मूग गिळून गप्प का आहेत? अशा उलटसुलट चर्चा शहरात तसेच सोशल मीडियावर सुरू आहेत.
भूलतज्ज्ञ आठवड्यातून दोनच वेळा 24-24 तासांची ड्युटी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल असतात. इतर वेळी खासगी भूलतज्ज्ञांना बोलवावे लागते. ती हजार रुपये त्यांची फी द्यावी लागेल, असे मी रुग्णाच्या नातेवाईक पतीस सांगितले. बाळंतपणासाठी भूल देणे आवश्यक बाब असल्याने त्या डॉक्टरांना देण्यासाठी खर्च येईल असे सांगितले, अन्य कोणत्याही उपचारासाठी पैशांची मागणी केली नाही.
डॉ. मोरे,
उपजिल्हा रुग्णालय,
कर्जत