। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
ओमिक्रॉनचा प्रदुर्भाव झपाट्याने होत आहे म्हणुनच ओमिक्रॉनचा फौलाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात 11 ऑक्सिजन युनिटसह 3 हजार 48 बेडची तयारी ठेवली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात सुरू आहे; मात्र कोरोनाचा जगभरातील मुक्काम वाढत असल्याने त्याचे व्हेरिएंट निर्माण होत आहे. पहिल्या कोरोना विषाणूनंतर डेल्टाप्लसने जगभरात हाहाकार माजवला होता. जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेचा तडाखा सर्वाधिक बसला. आता जिल्हा आरोग्य यंत्रणा मओमिक्रॉनफचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजन निर्मितीची 11 युनिट कार्यरत आहेत. दुसर्या लाटेच्या सुरवातीला जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जणवला होता. त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युनिट उभारण्यात आली. ती पुन्हा कार्यरत करण्याचे तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. दुसर्या लाटेत 17 मे रोजी एकाच दिवशी तब्बल 27 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला होता. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ऑक्सिजनच्या दीडपट ऑक्सिजन उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे.
पीएसए वर्गातील 11 युनिटमधून 8.35 मेट्रिक टन, एलएमओ वर्गातील एका युनिटमधून 92.47 मेट्रिक टन, ऑक्सिजन सिलेंडरमधील 264 बी टाईपमधून 0.51 मेट्रिक टन, 1168 डी टाईपमधून 10.61 मेट्रिक टन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमधून 5.07 असे एकूण 117.21 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरचे 244 बेड, आयसीयूमध्ये नॉनव्हेंटिलेटरचे 244 बेड, ऑक्सिजन असलेले 1 हजार 36 बेड, तर ऑक्सिजन नसलेले 1 हजार 524 बेड जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये तयार ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी 63.84 मेट्रिक टन ऑक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता असून ऑक्सिजनचा आवश्यक साठा सध्या उपलब्ध असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.