आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश
कोळी समाजाने मानले आ.जयंत पाटील यांचे आभार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्यावरील ग्रोयन्स बंधार्याच्या दुर्दशेबाबत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार बंदरे व परिवहन विभागाने ग्रोयन्स बंधारा तसेच खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाच्या उभारणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या बंधार्याचे काम आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांनी पुर्ण होणार असल्याने कोळी समाजाने त्यांचे आभार मानले आहेत.
शेकापक्षाच्या नेत्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या प्रयत्नातून वरसोली समुद्रकिनार्यावर धुप संरक्षक बंधारा बांधण्यात आला होता. ग्रोयन्स पद्धतीच्या या बंधार्यामुळे वरसोली समुद्रकिनार्याची होणारी धुप थांबून कोळीवाड्याला संरक्षक कवच निर्माण झाले होते. मात्र अलिकडे उधाणाच्या लाटांच्या मार्यामुळे तसेच चक्रीवादळ आणि पाठोपाठच्या अतिवृष्टीमुळे सदर बंधारा उध्वस्त झाला आहे. याबाबत कोळी समाजाने वारंवार मागणी करुन देखील शासन त्याकडे डोळेझाक करीत होते. शेवटी वरसोली कोळीवाडा येथे कोळी समाजाचे पाटील, पंच तसेच नाखवा संघाचे चेअरमन विविधी सोसायटीचे चेअरमन, खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, मार्तंड देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशा सर्वांनी एकत्र होत वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत यांच्या सहकार्याने शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांना साकडे घालीत अन्याय निवारण्याची मागणी केली होती. त्यावेळी आ. जयंत पाटील यांनी बंधार्याच्या झालेल्या नुकसानीची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी त्वरित संदर्भित अधिकारी वर्गा सोबत प्रत्यक्ष बोलणी करून पंचनामा करून घेण्याचे निर्देश देत सर्व कोळीबांधवांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आ. जयंत पाटील यांनी बंदरे विभागाला या संदर्भात पत्र देत तातडीने सदर बंधार्यांची दुरुस्ती आणि वरसोली चाळमळा येथे खाडी मुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाची उभारणी करण्याची मागणी केली. त्यानुसार मेरीटाईम बोर्डाचे अधिक्षक अभियंता देवरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुचना दिली आहे. त्यानुसार उध्वस्त झालेल्या वरसोली येथील ग्रोयन्स पद्धतीचा संरक्षक बंधार्याची तातडीने दुुरुस्ती करण्यासाठी शासन निर्णयानुसार धुप प्रतिबंधक उपाय योजनेच्या बांधकामांतर्गत दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सदर धुप प्रतिबंधक बंधार्यापासून 200 मीटर अंतरावर चाळमळा येथे खाडीमुखाजवळ मार्गदर्शक स्तंभाची उभारणी करण्याचे काम सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या लेखाशिर्ष क्र. 30511835 (तरंगती जेट्टी व तत्सम प्रवाशी सुविधा उभारणे) या योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आले असल्याचे देखील बंदरे विभागाने कळविले आहे. सदर कामाचे 1.50 कोटी इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले असून प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार सदर काम लवकरच मार्गी लागणार असल्याने वरसोली येथील कोळी समाजाने समाधान व्यक्त करीत आ. जयंत पाटील यांना धन्यवाद दिले आहेत. सदर कामासाठी तत्कालिन आमदार पंडित पाटील यांनी देखील विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन मागणी केली होती.