तयारी सुरु झाली

उत्तर प्रदेशामध्ये पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याने टोमॅटोच्या भाववाढीचा निषेध करण्यासाठी अभिनव प्रकार केला. एका भाजीच्या दुकानाच्या बाहेर टोमॅटो चोरीला जाऊ नयेत म्हणून खास पहिलवान पहारेकरी नियुक्त करून त्याने त्याचे फोटो व्हायरल केले. पण योगी सरकारला हा विनोद आवडला नाही. पोलिसांनी या कार्यकर्त्याविरुध्द समाजात द्वेषभावना पसरवत असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. देशात प्रत्यक्ष आणीबाणी लागू नसली तरी आपण सर्व कसे एका हुकुमशाही पोलिसी राजवटीकडे वाटचाल करीत आहोत याचे हे विदारक उदाहरण आहे. हे योगी नरेंद्र मोदींनंतरचे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे म्हणतात आणि पुढचे पंतप्रधान तेच होतील असे त्यांच्या भक्तांना वाटते. नरेंद्र मोदी राजवटीच्या काळात हिंदू धर्मवादी शक्तींनी देशातील न्यायपालिका, निवडणूक आयोग, पोलिस, प्रशासन अशा सर्व यंत्रणा पूर्णतः पोखरल्या आहेत. शिक्षणामध्येही त्यांनी हैदोस घातला असून या देशातील संस्कृती आणि इतिहास एकाच भगव्या हिंदू रंगात रंगवण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. माध्यमांवर त्यांचाच ताबा आहे. त्याद्वारे बहुसंख्य जनतेची बुध्दी भ्रष्ट करण्याचे प्रयत्न रोजच्या रोज चालू आहेत. त्यातून मोदी-भक्त आणि धर्मांध हिंदूंच्या अत्यंत हिंस्र टोळ्या तयार झाल्या आहेत. आपल्या विरोधी मत मांडणाऱ्यांवर या टोळ्या हल्ले चढवतात. त्यांना एकटे पाडतात. पोलिसांकरवी त्यांच्यावर खोटे खटले दाखल करतात. राजकीय विरोध करणाऱ्यांना वेगवेगळ्या चौकशांमध्ये अडकवले जाते. यामुळे प्रस्थापित म्हणवणारे भलेभले पक्ष डगमगून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, पुरोगामी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांनी पुण्यात भरवलेले सत्ता परिवर्तन शिबिर हे अत्यंत गरजेचे आणि आश्वासक पाऊल म्हणायला हवे. शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, समाजवादी पक्ष इत्यादींनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत स्वागतार्ह आहे.

तत्वांची किंमत

गेल्या दीड-दोन वर्षांपासून त्यांचे एकत्र येण्याचे व संयुक्त मोर्चा स्थापण्याचे प्रयत्न चालू होते. मध्यंतरी मुंबईत याबाबत बैठका झाल्या. पुण्यातील कार्यकर्त्यांचे शिबिर हा त्याचाच पुढचा टप्पा होय. या सहभागी पक्ष व संघटनांची विशिष्ट अशी विचारसरणी आहे. डाव्या विचारांच्या अनेक छटांचे दर्शन त्यांच्यात होते. त्याबाबत त्यांचे तात्विक मतभेद आहेत व त्या मतभेदांनाही अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र धर्मांध शक्तींना विरोध हा त्यांच्यातला समान धागा आहे. मधल्या काळात राज्याचे राजकारण कल्पनेच्या पलिकडे बदलले आहे. तत्व, निष्ठा या गोष्टी खुंटीला टांगून ठेवल्या गेल्या आहेत. सत्ता मिळवणे हे एकमेव ध्येय उरले आहे. विकास करण्यासाठी आम्ही सत्तेत आलो असे निर्लज्ज समर्थन गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी केले तर यंदा अजितदादा करीत आहेत. त्याला हिंदुत्व किंवा शरद पवारांचे धरसोडीचे धोरण अशा सबबींची जोड दिली जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकहाती जिंकणे हे भाजपचे ताबडतोबीचे ध्येय आहे. देशाला हिंदुत्ववादी करण्याच्या त्यांच्या प्रकल्पासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच विरोधकांमध्ये फूट पाडून दुबळे केले जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी हा भाजपला सणसणीत पर्याय ठरतो आहे असे लक्षात येताच अजितदादांच्या गटाला फोडण्यात आले. भाजपच्या हुकुमशाहीची पकड घट्ट होत चाललेली असताना प्रमुख विरोधी नेत्यांनी त्याविरुद्ध लढावे अशी जनतेची अपेक्षा होती. पण त्यांनी निराशा केली आणि स्वतःची कातडी वाचवण्याचा पवित्रा घेतला. आजवर फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन मते मिळवणारे हे राजकारणी किती लबाड आणि भित्रे आहेत याचे दर्शन जनतेला रोजच्या रोज घडत आहे. तुम्ही जी तत्वे सांगता त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही किती किंमत मोजायला तयार आहेता यावरच तुमची व त्या तत्वांची महत्ता ठरत असते. दुर्दैवाने राज्यातल्या नेत्यांनी भाजपला शरण जाऊन आपल्या तत्वांची किंमत मातीमोल केली आहे. अशा निराशेच्या वातावरणात पुरोगामी पक्ष मात्र आपला झेंडा घेऊन रस्त्यावरच्या संघर्षाला तयार आहेत.

ऐतिहासिक भूमिका

प्रागतिक पक्षांना त्यात अनेक आघाड्यांवर तोंड द्यावे लागेल. भाजपच्या धर्मांधतेला विरोधाचे सूत्र कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही याची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. पुण्यातील शिबिरात सर्वांनीच यावर मतैक्य व्यक्त केले. निवडणुकीच्या राजकारणात भाजपला शह देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र विकास आघाडीसोबत युती करावी लागणार आहे. आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या भांडवलवादी धोरणांशी सर्वच परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी कित्येक दशके लढाई केली आहे. त्यामुळे शेकाप असो की कम्युनिस्ट, अनेक भागांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस वा राष्ट्रवादी हाच राहिला आहे. काही वेळेला त्यांच्याशी मैत्री केली तरीही डाव्यांचा त्यांच्याविषयीचा अनुभव चांगला नाही. गेल्या वेळी, राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी रायगडात जो विश्वासघात केला त्याचे उदाहरण भाई जयंत पाटील यांनी या शिबिरात सांगितलेच. पण तरीही परिस्थितीची गरज म्हणून त्यांच्यासोबत जावे लागणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद बरीच कमी झाली आहे. याची जाणीव कदाचित त्यांना करून द्यावी लागेल. कारण, सत्ता अजूनही आपल्याकडेच आहे असा त्यांचा तोरा असतो. खरे तर, त्यांना डाव्यांची कधी नाही इतकी गरज आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वाटाघाटीत त्यांनी नमते घेणे आणि नंतर ठरलेल्या समझोत्याचे मनापासून पालन करणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. हे घडले नाही तर सर्वांचेच नुकसान होणार आहे. भाजपला अटकाव करण्याच्या लढाईत ज्या नैतिकतेची गरज आहे ती प्रामुख्याने डाव्यांकडे व काही प्रमाणात काँग्रेसकडेच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अधूनमधून भाजपशी जुळवून घेण्याचा पवित्रा घेतलेला असल्याने त्यांना आपली नैतिकता सिध्द करावी लागेल. या स्थितीत भाजपविरोधी संभाव्य आघाडीला ताळ्यावर ठेवण्याचे मोक्याचे काम केवळ डावेच करू शकतात. पूर्वी केंद्रात हरकिशनसिंग सुरजित यांनी अशी जबाबदारी पार पाडली होती. २०२४ च्या निवडणुका अनेक अर्थांनी ऐतिहासिक असतील. त्यावेळी प्रागतिकांची भूमिकाही तशीच ऐतिहासिक ठरावी.

Exit mobile version