आता प्रतीक्षा आचारसंहितेची
। रायगड । सुयोग आंग्रे ।
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, वरिष्ठ अधिकार्यांचे प्रशिक्षणदेखील पार पडले आहे. निवडणुकीसाठी लागणार्या 17 हजार 497 कर्मचार्यांची यादीही रायगड जिल्हा प्रशासनाने संकलित केली आहे.
मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी आता होणारी विधानसभेची निवडणूक शेवटची असू शकते, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. 2029 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना होईल, असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांसाठी व पक्षांसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची असणार आहे. अनेकांनी या निवडणुकीत विजयी व्हायचेच यादृष्टीने तयारी केली आहे. दरम्यान, प्रशासकीय तयारीदेखील अंतिम टप्प्यात असून, आता आचारसंहितेची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा जिल्हाभरात 2 हजार 790 मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रांवर किमान पाच कर्मचारी लागणार आहेत. 20 कर्मचारी प्रत्यक्षरित्या मतदानादिवशी कार्यरत असतील, पण त्यांना पर्याय म्हणून दोन ते अडीच हजार कर्मचारी अतिरिक्त असणार आहेत. पण, अनेकजण आतापासूनच इलेक्शन ड्यूटी रद्दसाठी फिल्डिंग लावून आहेत. निवडणुकीच्या कटकटीत पडायलाच नको म्हणून अनेकांनी ड्यूटी रद्दसाठी कारणेदेखील शोधून ठेवली आहेत. अनेकांनी अर्ज लिहून तयार केला असून, इलेक्शन ड्युटीचे पत्र हाती पडले की, तो अर्ज प्रशासनाला दिला जाईल. मात्र, खूपच गंभीर कारण असल्याशिवाय कोणाचीही इलेक्शन ड्यूटी रद्द होणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यात असणार्या सात विधानसभा मतदारसंघात 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल 24 लाख 46 हजार 153 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 12 लाख 40 हजार 562 पुरुष मतदार, तर 12 लाख 5 हजार 500 महिला मतदार आणि 91 मतदार तृतीयपंथी असणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात 6 लाख 34 हजार 197 मतदार, कर्जतमध्ये 3 लाख 13 हजार 884, उरणमध्ये 3 लाख 34 हजार 431, पेणमध्ये 3 लाख 5 हजार 518, अलिबागमध्ये 3 लाख 2 हजार 268 मतदार, श्रीवर्धनमध्ये 2 लाख 63 हजार 71 मतदार आणि महाडमध्ये 2 लाख 92 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभांपैकी अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची मदार महिला मतदारांवर असणार आहे. या तिन्ही मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत. मतदार यादीतील आकडेवारीनुसार, अलिबाग विधानसभा मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार 4 हजार 277 अधिक आहेत. श्रीवर्धन मतदारसंघात 4 हजार 709 महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. महाड विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार 1 हजार 404 ने अधिक आहेत. यामुळे अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदारसंघात महिला मतदार आमदार ठरविणार आहेत.
निवडणुकीची लगबग
मतदार 24,46,153
एकूण मतदान केंद्रे 2,790
एकूण बॅलेट युनिट 6,200
व्हीव्हीपॅट मशीन 3,681
एकूण कंट्रोल युनिट 3,405
निवडणुकीसाठी कर्मचारी 13,955