। अलिबाग । प्रतिनिधी ।
निवडणूका समोर आल्यावर या सरकाला बहिणींची आठवण आली. परंतु, अडीच वर्षात बहिणींची आठवण का आली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करत साम्या कोरडे म्हणाल्या, जिजाऊ, आहिल्यादेवी होळकर, माता रमाई, सावित्रीबाई फुले यांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे. ही परिवर्तनाची लढाई आहे. ही लढाई जिंकण्यासाठी आम्हाला लाडकी लेक नको, तर शिवबाची लेक हवे. चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने महिला म्हणून त्या विधानसभेच्या सभागृहात प्रश्न मांडतील. समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच नव्या नेतृत्वासाठी चित्रलेखा पाटील यांना निवडून देण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शेकाप राज्य विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा सौम्या कोरडे यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या, महिलांना व्यासपिठ मिळवून देणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. लेक शिवबाची अंतर्गत एक चांगला कार्यक्रम आज किहीम या ठिकाणी साजरा होत असल्याचा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना चांगला सन्मान दिला. त्यांची आई जिजाऊ यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली. सर्व जाती जमातीला एकत्र घेऊन कल्याणकारी राज्य निर्माण केले. परंतु, सध्याच्या सरकारच्या राज्यात महिला सुरक्षा, रोजगाराचा प्रश्न आहे. सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वाईट विचारांचे लोक सत्तेत आहेत. अलिबागमधील आमदारांची भीती व दहशत आहे. या तालुक्यातील पाणी, रस्ता, विजेचा प्रश्न आहे. अनेक विकासाची कामे रखडली आहेत.
सरकारने लाडकी बहिण योजना आणली. दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यात जमा केले जात आहेत. परंतु, महागाईचे संकट प्रचंड आहे. रोज दैनंदिन व्यवहारातील वस्तूंच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे. महिलांना घरखर्च चालविताना कसरत करावी लागते. हे चिंताजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नसलेल्या, लोकांचे हित न जाणणार्या या सरकारला आगामी निवडणूकीत जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे सौम्या कोरडे म्हणाल्या.
महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव
महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व्यवसायिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विभागातील तीसहून अधिक महिलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.










