पादचाऱ्यांसाठी अपघाताचा गंभीर धोका
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते विकासाची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असली, तरी शहराच्या प्रवेशद्वारावरील म्हसळा-दिघी नाका पोलीस चौकीजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या ठिकाणी चार ते पाच मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच पादचाऱ्यांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून नागरिकांनी संबंधित विभागाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
सदर मार्ग हा म्हसळा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा असून, येथे चोवीस तास वाहनांची सतत ये-जा सुरू असते. याच मार्गावरून श्रीवर्धन, बोर्ली-दिघी तसेच परिसरातील अनेक गावांकडे जाणारी वाहतूक होत असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात हलकी व जड वाहने या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र, पोलीस चौकीलगत पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने सांभाळत मार्ग काढावा लागत असून, अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
म्हसळा एस. टी. स्थानकापासून श्रीवर्धन व बोर्ली-दिघीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या विकसित रस्त्याच्या सुरुवातीचा सुमारे 50 मीटरचा भाग अद्यापही दुरुस्तीपासून वंचित राहिल्याने तेथे मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या भागाची अवस्था अधिकच बिकट झाली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वाहने जोरात आपटून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, भरधाव वाहनांमुळे खड्ड्यांतील साचलेले पाणी रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ आणखी वाढणार असल्याने म्हसळा नगर पंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात घडण्याची भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.







