सुदैवाने जीवितहानी नाही
| रसायनी | वार्ताहर |
सोमवारी (दि. 14) सायंकाळी अचानक सुसाट वेगाने सुटलेल्या वादळी वार्यामुळे चौक-कर्जत फाटा येथे मोठा बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, जोखीम पत्करुन लावल्या जाणार्या होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शासनाने बॅनर, होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश देऊनदेखील स्थानिक पातळीवर प्रशासन लक्ष देत नाही, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे. याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चौक येथे चौककडून कर्जतला जाणार्या चौक फाट्यावर होर्डिंगचे साम्राज्य पसरले आहे. तरीही तिथे स्थानिक पातळीवर असणार्या अधिकारी, कर्मचारी यांचे लक्ष नाही. आज जोरदार वारा सुटल्याने तेथील एक होर्डिंग पडून ते पोलीस चौकीवर कोसळले. सुदैवाने तिथे कुणीच नव्हते, त्यामुळे सर्वच प्रकारची हानी वाचली आहे. संबंधित प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. कुणाचा जीव गेल्यावर प्रशासनास जाग येईल का, असाही प्रश्न विचारला जात आहे.







