। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताकडून 2031मध्ये होत असलेल्या एएफसी आशियाई फुटबॉल करंडकाच्या आयोजनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही तयार असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून कळवण्यात आले आहे; मात्र, या स्पर्धेच्या आयोजनात भारतासमोर इतर सहा देशांचे आव्हान असणार आहे.
1956मध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. भारताला अद्याप एकदाही आशियाई फुटबॉल करंडक आयोजनाचा मान संपादन करता आलेला नाही. भारताकडून 2023 व 2027मध्ये आयोजनासाठी प्रयत्न करण्यात आला होता. तेव्हा भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होते. दोन्ही वेळा भारताकडून माघार घेण्यात आली होती. परंतु, आता 2031मधील स्पर्धेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, यावेळी भारतासह इतर सहा देश एएफसी आशियाई फुटबॉल करंडकांच्या आयोजनासाठी तयार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती, किर्गीस्तान, तजिकिस्तान व उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया व कुवेत या देशांमध्ये याआधीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.