प्रशांत नाईक, नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी घेतला आढावा
| अलिबाग | प्रतिनिधी |
मानाच्या दहीहंडी उत्सवाच्या तयारीला आता वेग आला असून, आज शेतकरी भवन येथे प्रशांत नाईक आणि अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी उत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. २४ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या या उत्सवाचे यंदाचे आयोजन अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि आकर्षक करण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
उत्सवाच्या नियोजनातील विविध कामांची सद्यस्थिती, सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांची तयारी, स्पर्धेचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे व्यवस्थापन तसेच उपस्थितांसाठी आवश्यक सुविधा याबाबत प्रशांत नाईक आणि नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. उत्सवाच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
अलिबागच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मानाच्या दहीहंडीला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे यंदाच्या उत्सवातही परंपरेला आधुनिकतेची जोड देत युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विशेषतः Gen-Z पिढीला उत्सवाशी जोडण्यासाठी Reel Star स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पारंपरिक गोविंदा स्पर्धेसोबतच युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यंदाच्या स्पर्धेत पुरुष गोविंदा पथकासाठी प्रथम क्रमांकाचे २ लाख ५१ हजार रुपये आणि मानाचा चषक, तर महिला गोविंदा पथकासाठी १ लाख १ हजार रुपये आणि मानाचा चषक देण्यात येणार आहे. Reel Star स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ११ हजार, द्वितीय ७ हजार आणि तृतीय ५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच उत्सवाची व्यापक प्रसिद्धी करण्याबाबतही आढावा बैठकीत चर्चा झाली.
२४ वर्षांची परंपरा जपत मानाच्या दहीहंडीला यंदा अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. परंपरा, प्रतिष्ठा आणि आधुनिकतेचा संगम साधत अलिबागच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसे आयोजन करण्यासाठी अंतिम टप्प्यातील तयारीला गती देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
उत्सवाच्या तयारीचा आढावा घेताना प्रशांत नाईक, नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित जबाबदार व्यक्ती उपस्थित होते.
