| अलिबाग | प्रतिनिधी |
दरवर्षी राज्यभर ज्या सोहळ्याची चर्चा होते, तो म्हणजे कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा. कृषीवल हळदीकुंकू म्हणजे महिलांचा मान, सौभाग्याचं दान, कर्तृत्वाचा सन्मान या उक्तीनुसार हळदीकुंकू सोहळा गुरुवारी (दि. 16) अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात सायंकाळी चार ते सात यावेळेत दिमाखात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. विविध मालिकांमधील सिनेतारका या सोहळ्याच्या आकर्षण ठरणर आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, कृषीवल परिवाराकडून सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेण्यात येत आहे.
कृषीवलतर्फे रायगडसह राज्यभर ठिकठिकाणी महिलांच्या सन्मानार्थ हळदीकुंकू सोहळे आयोजित केले जात असल्याने या सोहळ्याची नेहमीच जोरदार चर्चा असते. यंदाही हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारणारे कलाकार अलिबागमधील महिलांच्या भेटीला येऊन त्यांचा आनंद द्विगुणित करणार आहेत. या सोहळ्यादरम्यान महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला आघाडी प्रमुख तथा कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी प्राप्त करुन दिली आहे. या सोहळ्यामध्ये पीएनपी एज्युकेशन, पटेल ज्वेलर्स, मीना खाकी पावडर, सुहाना मसाले, रामबंधू आचार, सोसायटी चहापावडर, टॉयेटो कार अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल प्रदर्शन व विक्रीसाठी असणार आहे.
या हळदी कुंकू कार्यक्रमास स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील काव्या तथा ज्ञानदा रामतीर्थकर, ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतील मंजिरी तथा पूजा बिरारी, ‘साधी माणसं’ या मालिकेतील मीरा तथा शिवानी बावनकर या तीन अभिनेत्रींबरोबरच सत्या तथा आकाश नलावडे या अभिनेत्याची उपस्थिती राहणार आहे. विक्रमावर विक्रम करणारा हा सोहळा म्हणजे तालुक्यातील महिलांना सौभाग्याचे लेणे आणि साजशृंगार करण्यासाठी एक उत्सव आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.
खेळा लकी ड्रॉ, जिंका बक्षिसे
या सोहळ्यात लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थित महिलांना बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे. सोहळ्यात लकी ड्रॉ स्टॉल ठेवण्यात येणार आहे. त्याठिकाणी 20 रुपयांचे कुपन काढावे लागणार आहे. या सोहळ्यादरम्यानच निकाल जाहीर केला जाईल. त्यानुसार 17 जानेवारीला कृषीवलमध्ये विजेत्यांची नावे प्रसिद्ध केली जातील. यातील विजेत्यांना मिक्सर, गॅस शेगडी, शुध्द पाण्याचे आक्वागार्डचे भांडे, व ओव्हन आदी बक्षिसे देण्यात येणार आहेत.