कसोटी अजिंक्यपद सामन्यासाठी तयारी सुरु

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय संघाचे अव्वल खेळाडू आयपीएलमध्ये सर्वस्व देण्यास व्यस्त असताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांची सपोर्ट स्टाफ टीम जूनमध्ये होणार्‍या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत एकत्र येऊन तयारी सुरू करणार आहे.

7 ते 11 जूनदरम्यान ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना होणार आहे. गतवेळेस भारताच्या हातून विजेतेपद निसटले होते. यावेळी द्रविड आणि त्यांची टीम तयारीत कोणतीही कमी राहू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागणार आहे.

सर्वात मोठ्या अशा या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाला हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा, श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीचा प्रश्‍न सोडवायचा आहे, तसेच अपघातग्रस्त रिषभ पंतच्या ठिकाणीही योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याचबरोबर आयपीएलमधून होणारा सामन्यांचा ताण यावरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

स्वतः राहुल द्रविड, फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि इतर सपोर्ट स्टाफ यांची बैठक होणार आहे. त्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख (एनसीए) व्ही. व्ही. एस. लक्ष्मणही उपस्थित राहाणार आहेत.

लक्ष्मण एनसीएचे केवळ प्रमुखच नसून ते बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंच्या दुखापती आणि त्यावर होणार्‍या उपचारांवर लक्ष ठेवून असतात. जागतिक कसोटी अंतिम सामन्याअगोर खेळाडूंवरचा ताण या प्रमुख मुद्यावर द्रविड आणि लक्ष्मण यांच्यात सविस्तर चर्चा होईल, असे सांगण्यात येत आहे.

आयपीएलमध्ये खेळाडूंवरचा ताण कमी करण्याबाबत काही वृत्त प्रसिद्ध झालेली आहेत; परंतु बीसीसीआयकडून आम्हाला लेखी स्वरूपात कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सर्व फ्रँचाईसने कळवले आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंची सामन्यांची संख्या कमी होण्याची शक्यता नाही.

मोहम्मद शमी (गुजरात), उमेश यादव (कोलकता), मोहम्मद सिराज (बंगळूर), शार्दुल ठाकूर (कोलकता) आणि जयदेव उनाडकट (लखनौ) हे खेळाडू पूर्ण तंदुरुस्त राहिले तर जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी त्यांची निवड निश्‍चित आहे. परिणामी आयपीएलमधील त्यांच्यावर येणारा ताण महत्त्वाचा ठरणार आहे.

Exit mobile version