निवडणूक कर्मचार्‍यांची जय्यत तयारी सुरू

शाळांना एक दिवसाची झळाळी

। रायगड । प्रतिनिधी ।

मतदानासाठी काही तास शिल्लक राहिले असताना निवडणूक कर्मचार्‍यांसह कार्यकर्त्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहेत. किमान मतदानासाठी या शाळांमधील माजी विद्यार्थी येणार असल्याने शाळा परिसर स्वच्छ असावा, यासाठी भर दिला जात आहे, त्याचबरोबर पक्षीय कार्यकर्त्यांची निवडणूक बूथ उभारण्याची लगबग सुरू झाली आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त उमेदवार असल्याने मतदान केंद्राबाहेर आपल्या पक्षाचा निवडणूक बूथ असावा, असा आग्रह प्रत्येक उमेदवार करीत आहे. त्यामुळे आतापासूनच मोक्याच्या ठिकाणी बूथ उभारण्याची तयारी केली जात आहे. हे निवडणूक बूथ कसे असावेत, याबद्दल निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले असून त्यांची अंमलबजावणी उमेदवारांना करावी लागणार आहे. जे उमेदवार या आदर्श आचारसंहितेचा भंग करतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत.

शाळा झाल्या स्वच्छ
बुधवारी होणार्‍या मतदानासाठी निवडणूक कर्मचारी मंगळवारपासून रवाना होण्यास सुरुवात झाली होती. यासाठी शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात 90 टक्के मतदान जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होते; परंतु अलीकडे या शाळांची पुरती दैना झालेली दिसते. कमी विद्यार्थी पटसंख्येमुळे अनेक शाळा बंद पडत चालल्या आहेत. एक दिवसाच्या मतदानासाठी या शाळांची स्वच्छता करण्यात आली.
बूथबाबत कडक नियम
मतदान केंद्रे ही सरकारी इमारतीमध्येच लागतात. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा या उपलब्ध असल्याने याच ठिकाणी मतदान केंद्रे उभारली जातात. या मतदान केंद्रांच्या बाहेर निवडणूक बूथ कसे असावेत, यासंदर्भात निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन न केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केल्या आहेत.
दोनशे मीटर त्रिज्येबाहेर बूथ
200 मीटर त्रिज्येमध्ये उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत. एकाच इमारतीत किंवा आवारामध्ये अनेक मतदान केंद्रे असल्यास अशा सर्व मतदान केंद्राकरिता मिळून केवळ एक निवडणूक बूथ प्रत्येक उमेदवाराकरिता 200 मीटर त्रिज्येच्या बाहेर उभारता येईल. निवडणूक बूथ उभारण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यकतेनुसार सरकारी प्राधिकरणे, तसेच स्थानिक प्राधिकरणांच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. निवडणूक बूथ उभारल्यामुळे सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बूथ धार्मिक जागेमध्ये किंवा परिसरात उभारण्यात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
Exit mobile version