खालापूरमध्ये शेकापच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी

दहा हजार कार्यकर्त्यांसाठी भव्य सभा मंडप उभारणी अंतिम टप्प्यात

| खालापूर | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी आयोजन समितीसह प्रत्यक्ष सभा स्थळाची पाहणी करून आयोजनाचा आढावा घेतला. राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या राशी पेट्रोल पंप परिसरात उभारण्यात येत असलेला भव्य सभा मंडप पाहून त्यांनी विविध समित्यांना आवश्यक सूचना दिल्या.

आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांसाठी प्रशस्त आसनव्यवस्था करण्यात येत आहे. सभास्थळी येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, पत्रकारांसाठी विशेष कक्ष, तसेच एलईडी स्क्रीनद्वारे संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अशी अत्याधुनिक व्यवस्था उभारण्यात येत आहे. कार्यक्रमाचे नियोजन अधिक सुसूत्र आणि शिस्तबद्ध व्हावे यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून प्रत्येक समिती आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.

2 ऑगस्टचा हा वर्धापन दिन केवळ पक्षाचा वार्षिक सोहळा नसून शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विचारांचा, संघर्षशील परंपरेचा आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेल्या बांधिलकीचा एल्गार ठरणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये वातावरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते खालापूरमध्ये दाखल होणार असून लालबावट्याच्या साक्षीने विचारांची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उभी राहणार आहे.

आजच्या सत्ताकेंद्रित आणि पक्षांतराच्या राजकारणात विचारांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत असल्याचा संदेश या वर्धापन दिनातून दिला जाणार आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेणाऱ्या शेकापच्या संघर्षमय परंपरेचा पुनरुच्चार या व्यासपीठावरून होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. खालापूरमध्ये सुरू असलेली भव्य तयारी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आयोजनातील सुसूत्रता पाहता 2 ऑगस्ट रोजी लालबावट्याचे हे वादळ केवळ एका पक्षाचा कार्यक्रम न राहता विचार, संघर्ष आणि जनतेशी असलेल्या नात्याचा भव्य सोहळा ठरणार, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version