चौक येथील मोरे मसाला केंद्रांवर गर्दी
| रसायनी | वार्ताहर |
उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली की, महिलांकडून वाळवणे, मसाले बनवण्याची तयारी सुरू होते. दररोजच्या जेवणासाठी लागणारा लाल मसाला हा प्रत्येकाच्या घरात लागतोच. प्रत्येकाच्या मसाला बनवण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. सुका मसाला, लाल मसाला, घाटी मसाला, गोडा मसाला, आगरी-कोळी मसाला असे या मसाल्याचे प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मसाला बनवून घेतात.
मात्र, ऐन हंगामामध्ये मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला तीन ते चार वेळा उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धणे, बडीशोप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. मसाल्यांच्या खरेदीला वेग आला असून, तिखट बनवण्यासाठी लागणार्या मसाल्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. मिरची, मिरची पूड, खडा मसाला या महत्त्वाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साधारणपणे मार्चमध्ये घराघरात तिखट बनवण्याची घाई सुरू होते. मिरची खरेदीपासून तिखटासाठी लागणार्या पदार्थांच्या खरेदीची सुरुवात केली जाते. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. गावाला बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते हे माहीत असल्याने हल्ली मुंबईला राहणारे चाकरमानीदेखील गावाला असलेल्या आपल्या नातेवाईकांकडून मसाला बनवून घेतात. त्यामुळे एक महिना आधीपासूनच गृहिणींची मिरची खरेदीसाठीची लगबग सुरू झाली आहे.







