| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा येथील पेठाली मेट्रो स्थानकाच्या वाहनतळ परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मद्यप्राशन केल्यानंतर दारूच्या बाटल्या फोडून निघून जाण्याचे प्रकार घडत असल्याने परिसरात काचेचे तुकडे पसरले आहेत. यामुळे वाहनचालकांना दुखापत होण्याची शक्यता असून, वाहनतळाच्या सुरक्षेसाठी तातडीने सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गावरील बहुतांश स्थानकांवर सिडकोच्या माध्यमातून वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये पेठाली मेट्रो स्थानकाचाही समावेश आहे. या वाहनतळावर दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जातात. मात्र, परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने रात्रीच्या वेळी देखरेखीचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानक परिसरातील शांतता आणि अंधाराचा फायदा घेत काही तरुण येथे मद्यप्राशन करतात. त्यानंतर दारूच्या बाटल्या फोडून किंवा वाहनतळाच्या भिंतीलगत टाकून तेथून निघून जातात. त्यामुळे वाहनतळ परिसरात काचेचे तुकडे पसरत असून, वाहनांच्या टायरचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांना दुखापत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांमुळे परिसराच्या स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनतळाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी नियमित गस्त, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षारक्षकांची नियुक्ती करून मद्यपींच्या वावराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







