गड-किल्यांचे पावित्र्य जपा – अनिल वैती

। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा लाभला असल्याने दरवर्षी देश-विदेशातून लाखो शेकडो पर्यटक गड किल्ले तसेच लेण्या व देवी देवतांच्या मंदिरांना भेटी देत असतात. पण पर्यटनाचा आनंद लुटत असताना प्रेक्षणीय स्थळांचे पावित्र्य जपण्याचे कार्य अनेकांकडून दुर्लक्षित केले जात असल्याची खंत गायक अनिल वैती यांनी व्यक्त केली. प्रत्येक प्रेक्षणीय पर्यटनस्थळी घाण, अस्वच्छता व दारूच्या बाटल्यांचे साम्राज्य जिकडेतिकडे पहावयास मिळते. यामुळे परदेशी पर्यटकांच्या मनात आपल्या भारतीय संस्कृतीविषयी एक नकारात्मक भावना वाढीस लागली असून त्यामुळे भारतीय संस्कृतीला मानहानी सोसावी लागत आहे. याला कुठेतरी आळा बसण्याची नितांत गरज आहे. या विश्‍वासाला तडा जाऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती पावले उचलली जाण्याची नितांत गरज आहे तसेच प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने वागून गड-किल्ल्यांची स्वच्छता जपण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पुढाकार घेऊन गायक, समाजसेवक अनिल वैती यांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन नुकतेच येथे आई-बाबा प्रतिष्ठान व पंचमुखी शिव मंदिर मुलुंड यांच्यातर्फे एकविरा मंदिर परिसर व पाच पायरी परिसर स्वच्छता अभियान राबून परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता अभियानात मुलुंड सेवेकरी तसेच आकाश गीजे पाटील, एकविरा भक्त मंडळ मुलुंड, रवींद्र पाटील, नंदकुमार वैती व महेश विठोबा वैती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version