अमित शहांची दीडशे जिल्हाधिकार्यांना धमकीचे फोन; काँग्रेसचा खळबळजनक आरोप
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागणार आहे. मतमोजणीआधी दोन दिवस सस्पेन्स वाढला आहे. एक्झिट पोलचे आकडे हवे तसे लागले असले तरी भाजपाला मनातून पराभवाची भीती वाटत आहे. त्यामुळेच भाजपकडून दबावतंत्र वापरले जात असून काँग्रेसच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देशातील जिल्हाधिकार्यांना सातत्याने फोन करून धमक्या देत आहेत. सुमारे 150 जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकार्यांना त्यांनी धमकावले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने रमेश यांना पत्र लिहून त्यांच्या दाव्यासंदर्भात तपशील मागितला आहे. मात्र, रमेश यांनी निवडणूक आयोगावर विश्वास नाही, असे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच, अमित शहा यांच्याकडून मतमोजणीची जबाबदारी असलेल्या जिल्हाधिकार्यांना धमक्यांचे फोन जात आहेत, अशी पोस्ट जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर केली. शहा यांचे हे कृत्य लज्जास्पद आहे. 4 जूनला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपची सरकारमधून एक्झिट होऊन इंडिया आघाडीचा विजय होईल. त्यामुळेच भाजप नेते हताश होऊन निवडणूक अधिकार्यावर दबाव आणत आहेत, मात्र अधिकार्यानी त्या दबावाला न जुमानता संविधानाचा मान राखला पाहिजे. कारण देशातील जनता त्यांच्यावरही लक्ष ठेवून आहे, असे रमेश यांनी त्या पोस्टमध्ये म्हटले होते.
निवडणूक आयोगाने रमेश यांना पत्र लिहून त्यांच्या दाव्याशी संबंधित तपशील देण्यास सांगितले आहे. अमित शहा यांनी कोणत्या 150 जिल्हाधिकार्यांना फोन केले त्याची माहिती आयोगाने मागितली. राष्ट्रीय पक्षाचे जबाबदार, अनुभवी आणि ज्येष्ठ नेते असल्याने तुम्ही तथ्ये आणि माहितीच्या आधारे मतमोजणीच्या तारखेपूर्वी असे विधान केले आहे, अशा विधानांमुळे या प्रक्रियेवर संशय निर्माण होतो. त्यामुळे तपशील मिळाल्यास योग्य कारवाई करता येईल, असे आयोगाने पत्रात म्हटले होते.
आयोगावर विश्वास नाही जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. काँग्रेस निवडणूक आयोगाचा आदर करते, मात्र ही संस्था आजवर ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यावर विश्वास ठेवता येत नाही. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, ती निष्पक्ष असली पाहिजे. लोक केवळ पक्ष आणि उमेदवारांवरच लक्ष ठेवत नाहीत तर निवडणूक आयोगाकडेही लक्ष देत आहेत, असे रमेश यावेळी म्हणाले