गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांचा विश्वास
| नेरळ | प्रतिनिधी |
युनायटेड वेचे माध्यमातून कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी गेली दहा वर्षे नियोजनबद्ध कार्य सुरू आहे. या अभियानाचे माध्यमातून आदिवासी भागातील ग्रामपंचायतीमधील महिला वर्गाला एकत्र करून आदिशक्ती अभियान राबविले जात आहे. या अभियानात बोलताना कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी कर्जत तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण खाली आणण्यात युनायटेड वे आणि एकात्मिक बालविकास विभागाचे योगदान मोठे आहे. मात्र बालविवाह रोखल्यास हे प्रमाण आणखी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.
कर्जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी आदिशक्ती अभियानचे माध्यमातून महिला आणि किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन केले जात आहे. तर पोषण आहार प्रकल्पाच्या माध्यमातून गरोदर माता आणि नवजात बालके यांच्या आहाराचा प्रश्न सोडविला असल्याने त्याचा परिणाम कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी होण्यावर होत आहे. आदिशक्ती अभियानात महिलांचा सहभाग दिसून येत असून महिलांनी आता बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
युनायटेड वे कार्यान्वित पोषण प्रकल्पाच्या प्रतिनिधी रेखा जाधव यांनी कुपोषण मुक्ततेवर भर देत संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. खांडस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.प्राची यांनी गरोदर माताची घ्यावयाची विशेष काळजी, नवजात शिशूची घ्यावयाची काळजी आणि हिमोग्लोबीनचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले.







