| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शनिवारी (दि.24) मध्यरात्रीपासून ते दि. 4 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी मारुती बोरकर यांनी दिले.
जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येत असतात. अशा वेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. तसेच, सोमवारी (दि.26) गोकुळाष्टमी व मंगळवारी (दि.27) गोपाळकाला हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
या दरम्यान, शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने सोबत घेऊन फिरणे. तसेच, सभ्यता अगर निती याविरुध्द किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. सार्वजनिक रितिने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. तसेच, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश
