लाल मिरचीला दरवाढीचा तडका

गृहिणींच्या डोळ्यात पाणी

| सुकेळी | वार्ताहर |
सद्यःस्थितीत सर्वच गोष्टींमध्ये महागाईने डोके वर काढले आहे. या महागाईने सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्यामुळे अनेकांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. गृहिणींच्या दैनंदिन वापरामध्ये असलेल्या लाल मिरचीला महागाईची फोडणी बसली आहे. लाल मिरचीच्या सर्वच जाती यंदा प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांनी वाढल्या असल्यामुळे गृहिणींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येण्याची वेळ आली आहे.

लाल मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोयनाड बाजारपेठेसह रोहा, कोलाड, पाली, नागोठणे आदी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मिरची आणी खडा मसाला विक्रीसाठी सध्या दाखल झाले आहे. ही मिरची वेगवेगळ्या राज्यांतून या बाजारात येत असते. सद्यःस्थितीत बाजारपेठेत अनेक प्रकारचे तयार मसाले मिळत असले तरी घरगुती मसाल्याची ज्यांना सवय झालेली असते, ते मसाला तयार करण्यासाठी मिरची खरेदीकरिता जवळपासच्या बाजारात जात असतात.

साधारणपणे फेब्रुवारी ते मे या कालावधीत गृहिणींची मिरची खरेदीची लगबग ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. यावेळी अनेक बाजारपेठादेखील मिरच्यांची लालेलाल झाल्याचे चित्र पहावयास मिळते.यंदा मात्र मिरच्यांचा भाव हा 50 ते 60 रुपयांनी वाढला आहेत. यामध्ये लवंगी मिरची जवळपास 280 रुपये किलोमागे, तर बेडकी मिरची 500 ते 600 रुपये इतक्या महागाईने मिळत असल्यामुळे गृहिंणींमधून नाराजीचे सुरू उमटत आहेत.

Exit mobile version