अलिबाग: सुक्या मासळीचे भाव वधारले; मच्छी विक्रीतून लाखोंची उलाढाल

। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोकणात मासेमारी हंगाम सुरु झाला आहे. ओल्या मासळीबरोबर सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. राज्यभरातून सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. त्यामुळे सुक्या मासळीच्या विक्रीतून यंदा करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे. अलिबाग, मुरुड, उरण आणि श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यात मासळी सुकवण्यास टाकल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. यात महिला वर्ग हिरीरीने भाग घेत आहे. दिवसभर उन्हात राबून मच्छी सुकवण्याचे काम सध्या सुरु आहे.

बोंबील, जवळा, मांदेली, कोळंबी, बांगडा, माकूल आणि आंबाड या माश्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यामुळे ओल्या मासळीला चांगला दर मिळत नसल्याने मच्छी सुकविण्याव कोळी महिलांनी भर दिला आहे. सुक्या मासळीला राज्यभरातून तसेच आसपासच्या राज्यातून मोठी मागणी असते. त्यामुळे दरही चांगला मिळतो आहे. त्यामुळे अर्थातच मासे सुकविण्याकडे कोळी बांधवांचा कल वाढला आहे.

अलिबाग तालुक्यातील थळ, नवगाव, वरसोली ही गावे सुक्या मासळीसाठी प्रसिध्द आहेत. या ठिकाणची सुकी मच्छी राज्यातील विवीध भागात विक्रीसाठी पाठवली जात असते. याशिवाय कोकणात होणाऱ्या यात्रा उत्सवांमधूनही सुक्या मासळीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यातून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षी मासळीची आवक चांगली असल्याने सुक्या मासळीतून चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा मच्छीमार आणि कोळी बांधवांना आहे.

मासे कसे सुकवले जातात…….
मासे उन्हात सुकवून त्याच्या शरीरातील पाणी काढले जाते. सुकत टाकण्यापुर्वी त्याच्या शरीरातील काही भाग अन्नमार्ग काढला जातो. नंतर मिठाच्या पाण्यात बुडवून ते सुकविले जातात. हे मासे बरेच काळ टिकतात. प्रामुख्याने पावसाळी हंगामात खवय्यांची माश्यांची भूक भागविण्यात सुक्या मासळीचा मोठा हात असतो.

सुक्या मासळीचे दर…..
सुकीमासळी ३५० ते ४५० रुपये किलो.
वाकट्या ५०० ते ६०० रुपये किलो
अंबाड ४०० ते ५०० रुपये किलो
मांदेली ३०० रुपये किलो
माकले ४०० ते ६०० रुपये किलो
सुके बोंबील ४०० ते ५०० रुपये किलो
कोळंबीचे सोडे १५०० ते १८०० रुपये किलो

Exit mobile version