भाज्या-मासळीचे भाव वाढले

भाज्या शंभरी पार; हलवा माशाची किंमत दोन हजार रूपये
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।

पेट्रोल, डिझेलने शंभरी पार करून महागाईला केंव्हाच खतपाणी घातलेले असताना आता भाज्यांनी देखील शंभरी पार केल्याने आणि मार्केटमध्ये मासळी देखील हजाराच्या पटीत विक्रीस आल्याने सर्वसामान्य माणसाचे जगणं मुश्किल होण्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड कडाडल्याने सरकारचे अखेर हेच का अच्छे दिन? अशा संतप्त प्रतिक्रिया सोमवारी मुरूडच्या मार्केटमध्ये ऐकायला मिळाल्या.
मुरूड मधील मुख्य भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते निलेश कोलवनकर यांनी सांगितले की, घाऊक मार्केटमध्ये सर्व भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव कडाडले असून सर्व भाज्यांचे दर प्रति किलो 100 रूपयांच्या पुढे गेले असून विक्री करणे अवघड झाले आहे. कोथिंबीर जुडी 80 रूपये, टोमॅटो 80 रूपये, हिरवा वाटाणा 250 रूपये, प्लॉवर 120 रूपये अन्य सर्व भाज्याचे दर शंभरी पार गेले आहेत. भाव प्रचंड वाढल्याने खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची संख्या अगदीच कमी झाली आहे.
मुरूडमध्ये परतीच्या वादळी पावसामुळे मासळी खोल समुद्रात गेल्याने मासळीची देखील आवक घटली आहे. एरव्ही 700 रुपयाला मिळणारा हलवा 1500 ते 2000 रुपयांवर गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव जर असेच अटकेपार राहणार असतील तर कुटुंबव्यवस्था जिवंत ठेवणे अशक्यप्राय होईल अशा प्रतिक्रिया अनेक महिला व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version