बाजारात भाज्यांचे दर कडाडले

पावसामुळे भाज्यांची आवक घटली
। नवी मुंबई । वार्ताहर ।
परतीच्या पावसांमुळे भाज्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले असून मुंबईतील घाऊक बाजारातील आवक घटली आहे. त्याचा परिणाम भाज्यांची दरवाढ झाली असून ही दरवाढ आणखी एक ते दोन महिने कायम राहण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.
घाऊक बाजारात झालेल्या दरवाढीचा फायदा किरकोळ विक्रेत्यांनी उचलला असून घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारातील दर हे दुप्पट असल्याचे दिसून आले आहे. दसर्‍यामध्ये झालेली ही दरवाढ आता देवदिवाळी संपेपर्यंत राहणार आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारातील ही दरवाढ 40 टक्के असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना साथीमुळे भाज्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना मर्यादा आली होती. त्यामुळे सर्वच वाहतूकदार करोनाकाळात बाहेर पडत नव्हते. त्यामुळे मोजक्या वाहतूकदारांना मिळेल त्या भावात भाज्या विकण्याची वेळ गेल्या वर्षी भाज्या उत्पादकांवर आली होती. यंदा एप्रिलपासून पुन्हा सुरू झालेल्या कोरोना साथीमध्ये जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत झाली पण पावसाने यंदा चांगलाच जोर धरल्याने भाजी शेतकर्‍यांना अनेक वेळा या मुसळधार पावसाचा फटका बसला होता. सप्टेंबरमध्ये सर्व सुरळीत सुरू असताना भाज्यांचे दर स्थिरावले होते पण ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात सुरू झालेला परतीचा अवकाळी पावसाने मागील चार-पाच दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सरासरीपेक्षा यंदा पाऊस जास्त पडला असला तरी तो भाजी उत्पादकांना त्रासदायक ठरला आहे. त्यामुळे ज्या शेतात 30 टन भाज्यांचे उत्पादन येणार होते. त्या ठिकाणी केवळ 13 ते 15 टन उत्पादन आलेले आहे. सहाशे ते साडेसहाशे ट्रक भरून येणारी भाजी गेले काही दिवस पाचशे ट्रक टेम्पो येत आहे. यात पिक व्हॅन वाहनांचा जास्त समावेश आहे.

घाऊकमध्ये 40 ते 50 रुपये प्रतिकिलो
बहुतांशी प्रमुख भाज्यांचे दरही घाऊक बाजारात 40 ते 50 रुपये आहे तर किरकोळ बाजारात हेच दर 80 ते 100 रुपये होत आहेत. त्यामुळे ही दरवाढ 40 टक्के असल्याचे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कैलास तांजणे यांनी सांगितले.

Exit mobile version